दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांमध्ये भाजपाविरोधातल्या विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेण्यासाठी जाणार आहेत. या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत आमचं सरकार बनलं आणि काहीच दिवसांत केंद्र सरकारने आमच्या शक्ती हिरावल्या. आमच्या अधिकारांवर घाला घातला. परंतु आठ वर्ष दिल्लीकरांनी सुप्रीम कोर्टात लढाई लढली. आठ वर्षांनी सुप्रीम कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. परंतु या निर्णयानंतर अवघ्या आठ दिवसात केंद्र सरकारने नवा अध्यादेश काढून आमची शक्ती हिरावली. हे लोक सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, मोदी सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घाणेरड्या शिव्या दिल्या. हे लोक न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेविरोधात सोशल मीडियावर मोहीम राबवतात. यांचे लोक निवृत्त न्यायाधीशांना देशद्रोही म्हणतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवरच विश्वास नाही. आता हे म्हणत आहेत की, सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी आम्ही ऐकणार नाही. आम्ही अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचे निकाल उलथवून टाकू, अशी त्यांची भूमिका आहे. हे लोक जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडतात, आमदार खरेदी करतात, त्यांच्या मागे ईडी-सीबीआयचा ससेमिरा लावतात. जर यांना इतकाच अहंकार असेल तर मग हे लोक निवडणुका घेतातच कशाला.