लोकपाल विधेयकाच्या धर्तीवर लोकायुक्त विधेयकाचा आदर्श मसुदा तयार करून सर्व राज्यात सारखाच लोकायुक्त कायदा लागू करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, अरविंद केजरीवाल दिल्लीत सत्ता स्थापन करीत असल्याबद्दल विचारले असता ‘नो कॉमेंट’ एवढेच उत्तर देऊन केजरीवाल यांच्याविषयी मी काहीही बोलणार नसल्याचे हजारे यांनी सांगितले.
अण्णा म्हणाले, केंद्र सरकारने लोकपाल विधेयक मंजूर केले. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करताना त्यात काही त्रुटी राहू नयेत. या कायद्यासाठी चांगली नियमावली करणे गरजेचे आहे. त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच जनतेला या कायद्याचा फायदा होईल.
केंद्र सरकारने लोकपाल विधेयक मंजूर केले आता त्याचे अनुकरण राज्यांनी केले पाहिजे. प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा अस्तित्वात आला पाहिजे. प्रत्येक राज्यात सारखाच लोकायुक्त कायदा असला पाहिजे असे सांगताना अण्णा म्हणाले, लोकपालच्या धर्तीवर आदर्श लोकायुक्त विधेयकाचा मसुदा केंद्राने तयार करून तो प्रत्येक राज्याकडे पाठवावा व त्याची अंमलबजावणी त्या त्या राज्याने करावी. प्रत्येक राज्यात वेगवेगळा लोकायुक्त कायदा अस्तित्वात आल्यास हा कायदा कमकुवत होईल असेही मत त्यांनी व्यक्त केले.
लोकपाल कायद्यामुळे सीबीआय तसेच केंद्रीय लाचलुचपत विभागावरील सरकारचे नियंत्रण संपुष्टात आले. त्याचप्रमाणे राज्यातील लाचलुचपत विभागावरील राज्य सरकारचे नियंत्रण नष्ट करून हा विभाग लोकायुक्ताच्या नियंत्रणाखाली आला पाहिजे असेही हजारे यांनी सांगितले.