व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्टय़पूर्ण नाटय़मुद्रेचा ठसा उमविणारे ज्येष्ठ संगीत रंगकर्मी अरविंद पिळगावकर यांना यंदाचा संगीताचार्य बळवंत पांडुरंग ऊर्फ अण्णासाहेब किलरेस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
अरविंद पिळगावकर यांनी संगीताचे शिक्षण पं. के.डी. जावकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. गोविंदराव अग्नी यांच्याकडे घेतल्यानंतर डॉ. दाजी भाटवडेकर आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांकडे नाटय़ अभिनयाचे धडे घेतले. अरविंद पिळगावकर यांनी १९६४ सालापासून संगीत नाटकात भूमिका केल्या असून त्यांची वासवदत्ता, नयन तुझे जादूगार, घनश्याम नयनी आला, धाडिला राम का तिने वनी, हाच मुलाचा बाप, बावनखणी, संगीत सौभद्र, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मानापमान, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, रामराज्य या नाटकांमधील भूमिकांनी त्यांच्या गायनाची आणि अभिनयाची ओळख संगीत रंगभूमीला झाली. संत कान्होपात्रा, संत नामदेव, भाव तोचि देव या भक्तिरसप्रधान नाटकांतील त्यांचा अभिनयही गाजला. यापूर्वी हा पुरस्कार फैय्याज, प्रसाद सावकार व जयमाला शिलेदार यांना देण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा