परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन यासारखी पिके हातातून गेली आहेत. असे असतानाच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची मदत करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसीनीची पाहणी केली. उद्धव ठाकरे यांच्या याच दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. प्रसिद्धीसाठी उद्धव ठाकरे यांनी हा दौरा केला. मागील अडीच वर्षांत सत्तेत असताना त्यांनी काहीही केले नाही, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. याच टीकेला उद्धव ठाकरे गटातील नेते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोरगरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत, तुम्हाला लाज वाटत नाही का? असे सावंत शिंदे गट, भाजपा गटातील नेत्यांना उद्देशून म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>> मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

मागील अडीच वर्षे कशात गेली हे सर्वांनाच माहिती आहे. आमचे सरकार आले आणि हिंदुंच्या सणावरचे विघ्न गेले, असे ते म्हणत आहेत. त्यांना जनाची नाही, तर मनाची लाज वाटली पाहिजे. ते खोटे बोलत आहेत. गोरगरीब शेतकरी आत्महत्या करत आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का. धर्माधिष्ठीत राजकारणार करायला तुम्हाला बराच वेळ मिळतो. ते सातत्याने खोटं बोलत आहेत, असे अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा >>>> “…तर तुम्हाला आश्चर्य वाटेल,” शिंदे गट, भाजपातील पक्षप्रवेशावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान

एक नेतृत्व (उद्धव ठाकरे) घरातून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. त्यांच्याोसबत मी होतो. ते शेतातील पाण्यात उभे राहून नुकसानीची पाहणी करत होते. ते गेले याला महत्त्व आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घातली. ते (सत्ताधारी) मात्र वातानुकूलीत घरात बसून टीका करत आहेत, असा टोला सावंत यांनी लगावला. तसेच आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून चार वस्तू १०० रुपयांत दिल्या जात आहेत. मात्र लोकांना प्रत्यक्षात त्या मिळाल्या का? असा परखड सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला.

हेही वाचा >>>> उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले ‘हातातील आसुडाचा वापर करा,’ आता रावसाहेब दानवेंचा पलटवार; म्हणाले, “पहिला आसूड…”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून राजकारण पेटले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या आसुडाचा योग्य वापर करावा. सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढून शेतकऱ्यांनी त्यांचे हक्क घ्यावेत. शेतकऱ्यांनी हताश न होता लढावे, असे उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यादम्यान म्हणाले होते. तर त्यांच्या याच दौऱ्याबद्दल बोलताना शिंदे गटातील नेते उदय सामंत, अब्दुल सत्तार यांनी टीका केली होती. ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा आहे, असे सत्तार म्हणाले होते. तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना अडीच वर्षांमध्ये काहीही केले नाही. ते फक्त घरात बसून होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अगोदर त्यांच्यावरच आसूड ओढावा, अशी खरमरीत टीका केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind sawant criticizes eknath shinde group and bjp over criticized uddhav thackeray aurangabad visit prd