“करोना संसर्गाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे” अशी शंका अलीकडेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून व्यक्त केली. दरम्यानच्या काळात ७६ कामांमध्ये सुमारे १२ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाचा आरोप राज्य सरकारकडून करण्यात आला. या आरोपांनंतर कॅगकडून मुंबई महापालिकेची चौकशी केली जाणार आहे. या निर्णयानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पलटवार केला आहे.
केवळ मुंबईच नव्हे तर ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूर या महापालिकांचीदेखील कॅगकडून चौकशी केली जावी, अशी मागणी सावंतांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी सावंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची कॅगमार्फत चौकशी करत असाल तर नक्की करा. तुमच्या निर्णयाचं स्वागत आहे. पण गेल्या चार महिन्यात जनतेचा कारभार ठप्प होता. या काळात प्रशासकीय कारभार सुरू होता. या प्रशासकीय कारभाराचीही चौकशी झाली पाहिजे.
“मुंबई महापालिकेसोबत नागपूर, ठाणे, नाशिक आणि पुणे महानगरपालिकेचीही कॅगकडून चौकशी करावी, अशी मागणी मी करतो. कारण ठाणे महानगरपालिकेची तिजोरी तर रसातळाला गेली आहे. या सर्व महापालिकांची कॅगकडून चौकशी केली तरच तुम्ही न्यायिक भूमिका घेतली, असा संदेश जाईल. नाहीतर ही पुन्हा एकदा तुमची राजकीय भूमिका ठरेल. आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कॅगने संबंधित सर्व महापालिकांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी अरविंद सावंतांनी केली.
सावंत पुढे म्हणाले की, यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात एकनाथ शिंदे हेच नगरविकास मंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एकनाथ शिंदेच नगरविकास मंत्री होते आणि आताही नगरविकास खातं त्यांच्याकडेच आहे. या सगळ्या कारभाराला एकनाथ शिंदेच जबाबदार आहेत. त्याचीही जाणीव आपण ठेवली पाहिजे.