केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपली भूमिका मांडली आहे. पाठीत खुपसण्यासाठी काहीतरी शस्त्र हवं होतं, ते शस्त्र शिंदे गटाला देण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.
“शिंदे गटाला पाठीत खुपसण्यासाठी काहीतरी शस्त्र पाहिजे होतं, ते शस्त्र त्यांना देण्यात आलं आहे. त्यांचे जे चाणक्य (भाजपा) आहेत, त्यांनी शिंदे गटाच्या हाती तलवार दिली असून ते खुपसण्यास सांगत आहेत. भाजपानं स्वत:साठी ढाल घेतली आहे आणि पाठीत खुपसण्यासाठी शिंदे गटाच्या हाती तलवार दिली आहे. यामध्ये काही विशेष नाहीये. त्यामुळे आम्हाला याचा काही फरकही पडत नाही, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान, अरविंद सांवत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. १९८५ साली शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हावर छगन भुजबळ निवडून आल्यानंतर बाळासाहेबांनी भाजपाबाबत केलेल्या एका विधानाची आठवणही अरविंद सावंतांनी करून दिली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना अरविंद सावंत म्हणाले की, निवडणूक आयोगानं आम्हाला ‘मशाल’ हे चिन्ह दिल्यानंतर १९८५ सालातील बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावेळीही आमच्याकडे ‘मशाल’ हीच निशाणी होती. तेव्हा छगन भुजबळ हे ‘मशाल’ निशाणीवर निवडून आले होते. या निवडणुकीनंतर बाळासाहेब भाजपाबद्दल म्हणाले होते की, कमळाबाई खिडकी उघडून शरद पवारांना डोळा मारत होती, हे बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे.
त्याच कमळाबाईने २०१४ साली आमची युती तोडली. तेव्हा शिंदे गटाचे हिंदुत्वाचे विचार कुठे गेले होते? २०१४ साली युती तोडल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसलो होतो. तेव्हा ठाणेवाले लाचारासारखं कधी एकदा सत्तेत जातो आणि मंत्री होतो, यासाठी उतावीळ झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच होकार दिला म्हणून ते तिकडे मंत्री झाले. २०१४ साली उद्धव ठाकरे एकटे लढले होते. तरीही ६३ जागा जिंकल्या होत्या. तेव्हा तुम्ही ठाण्याच्या बाहेरही पडला नव्हता, असा टोला अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंना नाव न घेता लगावला आहे.