केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल” असे भाकित सावंत यांनी वर्तवले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सावंत यांनी हे विधान केलं आहे. “गुजरातचे प्रकल्प पळवायचे थांबले, कारण निवडणूक जाहीर झाली. आता महाराष्ट्राला प्रलोभण देण्याचं काम सुरु आहे” असा आरोप त्यांनी केला. राज्यात घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतात जाऊन घाम गाळला. हे सर्व ते प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी शेतात काम केलं. स्ट्रॉबेरीचा विषय मांडला. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काळीज फाटलं आहे. आत्महत्या होत आहेत. त्यांनी या शेतकऱ्यांना मदत करणं सोडलं आणि प्रसिद्धीसाठी हे सर्व सुरू केलं”, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
दोन लाख कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात-मोदी
महाराष्ट्रात दोन लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. “केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील”, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
राज्य सरकारकडूनही मोठ्या घोषणा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राज्यात यंदा ७५ हजार शासकीय पदभरतीची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. ‘महासंकल्प’ रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कोकण विभागातील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन गुरुवारी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात येत्या आठवडाभरात १८ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात निघणार आहे. तर महिनाभरात ग्रामविकास विभागात १० हजार ५०० पदांची भरती केली जाणार आहे.