केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटातील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपली भूमिक मांडली आहे. पाठीत खुपसण्यासाठी काहीतरी शस्त्र हवं होतं, ते शस्त्र शिंदे गटाला देण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे.

शिंदे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून ‘ढाल-तलवार’ मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, शिंदे गटाला पाठीत खुपसण्यासाठी काहीतरी शस्त्र पाहिजे होतं, ते शस्त्र त्यांना आता देण्यात आलं आहे. त्यांचे जे चाणक्य (भाजपा) आहेत, त्यांनी शिंदे गटाच्या हाती तलवार दिली असून ते खुपसण्यास सांगत आहेत. भाजपा स्वत: ढाल घेऊन उभी आहे. भाजपानं स्वत:साठी ढाल घेतली आहे आणि पाठीत खुपसण्यासाठी शिंदे गटाच्या हाती तलवार दिली आहे. यामध्ये काही विशेष नाहीये. त्यामुळे आम्हाला याचा काही फरकही पडत नाही, अशी प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “शिंदे गटाला जे हवं, तेच त्यांना कसं मिळतं?” निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर अनिल देसाईंचा सवाल

आमच्या हातात मार्ग दाखवणारं चिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रात्री-अपरात्री एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना मार्ग दाखवण्यासाठी मशाल वापरली जात होती. गड जिंकल्यावरदेखील एकमेकांना संदेश पोहचवण्यासाठी मशाल पेटवली जात होती. सध्या देशाला दिशा दाखवण्याची गरज आहे, यांनी देशाची दशा केली आहे. यांना दिशा दाखवण्यासाठी मशालच आवश्यक आहे, ती मशाल आम्हाला मिळाली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, असंही सावंत म्हणाले.

हेही वाचा- शिंदे गटाला मिळालेल्या नावावर वारसदारांना आक्षेप घेता येतो का? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू, म्हणाले…

शिंदे गटाला इशारा देत अरविंद सावंत पुढे म्हणाले, “आमच्या हाती मशाल आहे. तुम्ही जळून खाक व्हाल. आमची मशाल साधी नाही. तुम्ही जवळही येऊ शकणार नाही. आमच्या मशालीची धगही तुम्ही सहन करू शकणार नाही. तेव्हा आमच्या हातात मशाल नव्हती म्हणून तुम्ही पाठीत वार केला.”

Story img Loader