निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता निर्णय घेतल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या नावासह पर्यायी निवडणूक चिन्हे निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. असे असतानाच शिंदे गट ही निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरच आता उद्धव ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची (भाजपा, शिंदे गट) धनुष्याबाण निवडणूक चिन्हाविरोधात लढण्याची हिंमत झाली नाही. म्हणूनच त्यांनी हे चिन्ह गोठवले. भाजपाने आग लावली, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

सुनावणी न करता, छाननी न करता निवडणूक आयोगाने चार तासांत निर्णय घेतला. भाजपाने आग लावली. मात्र आता अंधेरीच्या पोटनिवडणुकीबाबत ते शांत आहेत. त्यांची धनुष्यबाणाविरोधात लढण्याची हिंमत झाली नाही, म्हणूनच त्यांनी चिन्ह गोठवले, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी केली.

हेही वाचा >>> Shinde vs Thackeray: ‘शिवसेनाहे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उध्दव ठाकरे काय म्हणाले? वाचा संपूर्ण भाषण

निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कोणाच्या म्हणण्यावरून घेण्यात आला? हे सारं संशयास्पद आहे. आता निवडणूक आयोगाच्या रुपात आणखी एक संस्था वेठबीगार झाली आहे. दाखल केलेल्या शपथपत्रांची छाननी करण्यात आली नाही, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.

ठाकरे गटाने वेळकाढूपणा केला. सातत्याने निवडणूक आयोगापुढे तारखा वाढवून घेतला. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. यावर अरविंद सावंत यांनी उत्तर दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे. त्याला कोण विलंब करत आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय का होत नाहीये? याचे उत्तर शिंदे गटाने द्यायला हवे. हा विलंब कोण करतंय, हा विलंब कोणाच्या इशाऱ्याने होतोय, हेही सांगावे, असा प्रतिप्रश्न अरविंद सावंत यांनी केला.

Story img Loader