दहावीच्या परीक्षेत सहापकी चार विषयात पैकीच्या पैकी
दापोलीच्या आर्या विवेक तलाठी हिने दहावीच्या परीक्षेत सहापकी चार विषयात शंभर गुण मिळवून या परीक्षेत नवा विक्रम नोंदवला आहे. ए. जी. हायस्कूलच्या या विद्याíथनीने पुनर्तपासणीसाठी केलेल्या अर्जानंतर ही बाब उघड झाली आहे.
यापूर्वी मिळालेल्या निकालानुसार आर्या विवेक तलाठी हिला गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या तीन विषयात प्रत्येकी शंभर गुण, तर मराठी, इंग्लिश आणि संस्कृत या विषयात ९५ गुण मिळाले होते. संस्कृत विषयात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने तिने या विषयाच्या उत्तरपत्रिकेची पुनर्तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तसा अर्ज परीक्षा मंडळाकडे केल्यानंतर तिचा आत्मविश्वास खरा ठरला.
परीक्षा मंडळाने आर्याने लिहिलेल्या संस्कृतच्या उत्तरपत्रिकेची पुनर्तपासणी केली. त्यात गुणांची बेरीज चुकल्याचे स्पष्ट झाले. तिला संस्कृतमध्ये ९५ नव्हे, शंभरपकी शंभर गुण मिळाले होते. तसे पत्र परीक्षा मंडळाने काल आर्याला सुपूर्द करून नवा निकाल जाहीर केला. त्यात सहापकी चार विषयात तिला शंभर गुण मिळाले असून ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार तिला ९९ टक्के मिळाले आहेत. या निकालाने आर्याने एसएससी परीक्षेत नवा विक्रम नोंदवला आहे. नव्या निकालानुसार लेखी परीक्षेत आर्या विवेक तलाठी राज्यात अव्वल आल्याचा दावा ए. जी. हायस्कूल प्रशासनाने केला आहे.