गेल्या वर्षी जवळपास पाच ते सहा महिने ज्या प्रकरणाचा बोलबाला राहिला, त्या आर्यन खान प्रकरणात आज एनसीबीकडून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आर्यन खानला कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी प्रमुख आरोपी करण्यात आले होते. त्यासंदर्भात आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात देखील होता. मात्र, आता आर्यन खानला क्लीनचिट दिल्यामुळे एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. यासंदर्भात सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्यामधून या संपूर्ण प्रकरणावरून निशाणा साधण्यात आला आहे.

६ हजार पानांचे आरोपपत्र!

एनसीबीने या प्रकरणात जवळपास सहा हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात आर्यन खानसह इतर ६ आरोपींचा समावेश करण्यात आलेला नाही. एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती ६ जणांविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आर्यन खान आणि इतर पाच जणांची नावं आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत.

एनसीबीकडून वगळण्यात आलेल्या नावांमध्ये आर्यन खान याच्यासह अविन शुक्ला, गोपाल आनंद, समीर साईघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांचा समावेश आहे.

दरम्यान, आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात सूचक ट्वीट करण्यात आलं आहे. “आर्यन खान आणि त्याच्यासोबत इतर पाच जणांना या प्रकरणात आता क्लीनचिट मिळाली आहे. त्यामुळे आता एनसीबी समीर वानखेडे, त्यांची टीम आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीविरोधात कारवाई करेल का? की गुन्हेगारांना ते पाठिशी घालतील?” असा सवाल या ट्वीटमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

काय घडलं होतं गेल्या वर्षी?

एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांना पुरावे न मिळाल्याने क्लीन चिट देताना या प्रकरणातील घटनाक्रमाची माहितीही दिली आहे. यानुसार एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमितला इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून ताब्यात घेतलं. नुपूर, मोहक आणि मुनमुनला कार्डेलिया क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी आर्यन आणि मोहक वगळता सर्वांकडे ड्रग्ज सापडले. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीने केला. नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आला. एसआयटीने १४ आरोपींविरोधात तपास केला. तपासात ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांचे आरोपपत्रातून नाव हटवण्यात आले.

Story img Loader