राज्यात भीषण दुष्काळ असताना स्वयंघोषित संत आसाराम बापू आणि त्यांच्या अनुयायांनी नाशिकपाठोपाठ नागपूर शहरातही लाखो लीटर पाण्याची नासाडी करून धूळवड साजरी केली. आसाराम बापू दरवर्षी होळीच्या काही दिवस आधी अध्यात्म आणि सत्संगाच्या नावाखाली अशी धूळवड साजरी करतात. मात्र यंदा राज्यातील जीवघेण्या दुष्काळाचेही भान राखता येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर रविवारी दुपारपासून अनेक तास आसाराम बापू आणि त्यांच्या अनुयायांनी हजारो लीटर पाणी अंगावर उडवून घेत धूळवड साजरी केली़ त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अध्यात्माच्या नावाखाली झालेली पाण्याची नासाडी नागरिकांना मुळीच रुचलेली नाही. आसाराम बापूंच्या धुळवडीसाठी खाजगी टँकर आणि महापालिकेच्या पाच टँकर्सचे पाणी वापरण्यात आले. याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून पाण्याच्या नासाडीबद्दल बापूंसह आयोजक मंडळाला नोटीस जारी केली आहे. नागपूर महापालिकेच्या धोरणानुसार मागेल त्याला टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून त्याचा अपव्यय करणाऱ्याविरुद्ध एनएमसी पाणी कायदा कलम ३० (१/सी) अन्वये कारवाई केली जाऊ शकते. दोषी व्यक्तीची नळ जोडणी कायमची तोडण्याची तरतुदही कायद्यात आहे. त्यामुळे आयोजक संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर अशी कारवाई होण्याची शक्यता आहे.
आसाराम बापूंच्या होलिकोत्सव कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये, असे पत्र अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी महापालिकेला लिहिले होते. तरीही या कार्यक्रमासाठी पालिकेने प्रत्येकी दहा हजार लीटर पाण्याचे पाच टँकर पाठविले. नागपूर शहराच्या अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी ओरड सुरू असताना या कार्यक्रमासाठी टँकर कसे उपलब्ध झाले, असा प्रश्न अंनिससह अनेक संघटनांनी केला आहे. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत आसाराम बापूंनी टँकरची तोटी हाती घेऊन अर्धा तासपर्यंत पाण्याचे फव्वारे उडविले. लोकांच्या अंगावर पळसफुलांच्या रंगांचे पाणी अक्षरश: ओतण्यात आले. हा प्रकार टाळता आला असता, असे सुजाण नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनीही या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आह़े
पळसफुले अवैध मार्गाने जंगलातून आणण्यात आली, असा आरोप अंनिसच्या महिला आघाडीच्या नेत्या निशा मौंदेकर यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या निषेधार्थ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी झाशी राणी चौकात काळे झेंडे घेऊन निदर्शने केली. या वेळी जनमंचचे अॅड. अनिल किलोर यांनीही दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या आसाराम बापूंनी दुष्काळ निवारणासाठी त्याचा वापर करून दाखवावा, असे आव्हानच दिले.
लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्यानंतर नागपूर महापालिका जागी झाली आहे. आयोजक मंडळ आणि आसाराम बापूंना नोटीस जारी करून वाया गेलेले पाणी पुन्हा परत येईल का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. कायद्यानुसार फक्त दंडात्मक कारवाई करून दोषींना मोकळे सोडले जाईल. परंतु, आगामी काळात नागपुरात जाणवणाऱ्या भीषण पाणीटंचाईचे काय? अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी या कार्यक्रमांवर देशभर बंदी आणली पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते उमेश चौबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
दुष्काळात आसाराम बापूंचा ‘जलसत्संग’
राज्यात भीषण दुष्काळ असताना स्वयंघोषित संत आसाराम बापू आणि त्यांच्या अनुयायांनी नाशिकपाठोपाठ नागपूर शहरातही लाखो लीटर पाण्याची नासाडी करून धूळवड साजरी केली. आसाराम बापू दरवर्षी होळीच्या काही दिवस आधी अध्यात्म आणि सत्संगाच्या नावाखाली अशी धूळवड साजरी करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-03-2013 at 04:27 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As maharashtra battles drought asaram bapu wastes water