करोनाच्या टाळेबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राट्रेक, एसीसी, माणिकगड, अंबुजा या प्रसिद्ध सिमेंट कंपन्यांच्या पाच प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. मात्र या पाचही कंपन्यांनी सिमेंटच्या एका बँग मागे ४० रूपये दरवाढ केल्याने बांधकाम व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. तसेच एसीसी व अंबुजा या दोन कंपन्यांनी ट्रक भाड्यात २० टक्के कपात केल्याने वाहतुक व्यवसायिकांनी काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
करोनाच्या टाळेबंदीत चंद्रपूर जिल्ह्यातील एसीसी, अंबूजा, माणिकगड, अल्ट्राटेक या चार सिमेंट कंपन्यांचे पाच प्रकल्प पूर्णत: बंद होते. ग्रीन झोन मध्ये येणाऱ्या जिल्ह्यातील उद्योगांना सुरू करण्याची परवानगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सिमेंट कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेवून उत्पादन सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कंपन्यांनी उत्पादन व वाहतुक सुरू केली. मात्र उद्योग सुरू होताच सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या एका बँग मागे ४० रूपये इतकी दरवाढ केल्याने बांधकाम व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे.
आणखी वाचा- गणेशमुर्ती व्यवसायाला टाळेबंदीतून शिथीलता देण्याची मागणी
अगोदरच मंदी, त्यातही बांधकाम व्यवसायात तर मागील तीन वर्षापासून मंदीचे सावट आहे. अशात आताकुठे बांधकामाला अंशत: मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यातही शासकीये कामे पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यासाठी बांधकामाला परवानगी दिली आहे. अशा स्थितीत सिमेंट कंपन्यांनी अचानक बॅग मागे ४० रूपये दरवाढ केल्याने तीव्र रोष व्यक्त होत आहे. तसेच एसीसी व अंबुजा या दोन सिमेंट कंपन्यांनी तर वाहतुक ट्रकांचे भाडे २० टक्के कमी करण्याचे निर्देश दिले आहे. या दोन्ही कंपन्यांचे सिमेंट वाहतूकीसाठी मोठ्या वाहतुक कंपन्या सक्रीय आहेत. मात्र आता अचानक २० टक्के दर कमी करण्याचे कंपन्यांनी सूचविल्याने वाहतुक कंपन्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचा परिणाम वाहतुक कंपन्यांनी काम करण्यास नकार देत हात वर केले आहे