शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत फारच आक्रमक झाले आहेत. विविध मुद्द्यांवरून ते शिंदे गट आणि भाजपाला घेरत असतात. सरकारच्या विविध धोरणांवर आणि योजनांवर ते टीका करत असतात. तसंच, कधीकधी थेट नेत्यांवर निशाणा साधतात. रोज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना ते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करतात. आज तर भर पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या खासदाराचं नाव ऐकताच त्यांनी थूं असं म्हटलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ठाकरेंना उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील असं श्रीकांत शिंदे म्हणाले. श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी संजय राऊतांना प्रश्न विचारला. संजय राऊतांनी प्रश्न ऐकून घेतला आणि विचारले असं कोण म्हणालं. तेवढ्यात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं. श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच संजय राऊत ऑन कॅमेरा थुंकले. त्यांच्या या कृतीमुळे पत्रकारांनी श्रीकांत शिंदेचा प्रश्न तिथेच संपवला आणि पुढच्या विषयांवर चर्चा सुरू झाली.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले होते?
“ठाकरेंना इथली उष्णता सहन होत नसेल म्हणून ते परदेशात गेले असतील. ज्यांच्या नावावर राजकारण केलं, मतं मागितली त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तरी ते येणार आहेत का? पण ज्याठिकाणी ते गेले आहेत तिथल्या राज्याचा नुकताच राज्याभिषेक झाला आहे, त्यांना तरी भेटायला जावू नये”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
शिंदेंचं सिंहासन लवकरच हलणार
प्रमुख नेता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला निमंत्रण द्यायला गेला त्यात राजकारण काय असू शकतं. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. राज्याच्या दुर्दैवाने म्हणा मुख्यमंत्री पदावर एक व्यक्ती बसली आहे, तो मुख्यमंत्री पदाचा मान असतो. व्यक्तीचा नसतो. त्यामुळे ते आमंत्रण द्यायला गेले. यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून गेलं वगैरे, काही नाही हललं. असतं हलतं का. त्यांचं सिंहासन हलणार आहे लवकरच. शरद पवार आणि मुख्यमंत्री भेटले असतील तर ती औपचारिक भेट आहे. त्यांच्या संस्थेचा सोहळा आहे म्हणून आमंत्रण द्यायला गेले. अशा पद्धतीने कोणी कोणाकडे जायला नको. विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना भेटत असतात एकमेकांच्या चेंबरमध्ये. त्यांची बैठक आहे, भेटले असतील. जनतेचा विषय नाहीय, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “…मग उपकार केले का?”, राज्य सरकारच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावर संजय राऊतांचा खोचक सवाल
जागावाटप सुरळीतपणे पार पडेल
लोकसभा आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अत्यंत सुरळीतपणे पार पडेल. कोणालाही चिंता वाटायचं कारण नाही. माझं स्पष्ट मत आहे, लोकसभेचे जागावाटप व्यवस्थित बसून चर्चा होईल. प्रत्येक जागेचा उहापोह केला जाईल. ही जागा कोण जिंकू शकेल, कशाप्रकारे जिंकू शकेल, एकमेकांना कशाप्रकार सहकार्य केलं पाहिजे, त्यासंदर्भात चर्चा करू. त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. विधानसभेचं जागावाटपही त्याच पद्धतीने होईल. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद होणार नाहीत. महाविकास आघाडी ज्याला आम्ही वज्रमुठ म्हणतो ते कायम राहिल, असंही संजय राऊत म्हणाले.