छत्रपती संभाजीनगर : वंदे भारतची सध्या गती १६० किलोमीटर प्रतितास आहे. येत्या काळात ती २५० पर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या तीन-चार वर्षांत मराठवाडय़ातील माणूस एक दिवसात मुंबईतील कामे करून परत येईल अशी दळणवळण व्यवस्था निर्माण करण्यात येईल. जालना- संभाजीनगर हा औद्योगिक पट्टा आर्थिक राजधानी मुंबईशी जोडला जात असल्याने त्याचे अनेक फायदे दिसतील, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जालना ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान त्यांनी वंदे भारत रेल्वेतून प्रवास केला. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 राज्यात सध्या एक लाख सहा हजार कोटी रुपयांची रेल्वेची कामे सुरू आहेत. या वर्षी राज्यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून वेगाने काम होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेल्वेच्या विकासकामांसाठी लागणारा ५० टक्के हिस्सा भरणार नाही, अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. त्यामुळे मधल्या काळात रेल्वेचा विकास थांबला होता. आता त्याला गती देण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

हेही वाचा >>>संभाजीनगरमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनप्रसंगी राडा, भाजपा अन् एमआयएमचे कार्यकर्ते भिडले; जलील टीका करत म्हणाले…

 रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या निमंत्रणपत्रिकेत आपले नाव टाकले नाही. आपण सर्वाधिक रेल्वे विकासाचे प्रश्न उपस्थित करूनही आपणास समारंभास बोलावणे टाळले, असा आरोप छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठक घेऊन केल्यानंतर एमआयएमच्या समर्थकांनी रेल्वे स्थानकावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिउत्तर दिले. 

आठ डब्यांची गाडी

जालना-छत्रपती संभाजीनगर- नाशिक-ठाणे ते मुंबई असा या रेल्वेचा प्रवास असणार असून, प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे. या रेल्वेची ५३० प्रवासीक्षमता असून त्यास आठ डबे जोडले आहेत. भारतामध्ये वंदे भारत रेल्वेंची संख्या ३४ झाली आहे. मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या रेल्वे दुहेरीकरणासाठी जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As vande bharat will increase the speed of the railway the industrial sector in marathwada will benefit devendra fadnavis amy