सोलापूर : प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या दशकपूर्तीचा दुसरा दिवस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक असद खान यांच्या सतारवादनाने आणि विख्यात शास्त्रीय गायक पद्मश्री पं. एम. व्यंकटेशकुमार यांच्या भावगहिऱ्या गायनाने गाजला. या संस्मरणीय संगीत महोत्सवाची दिमाखात सांगता झाली.
हुतात्मा स्मृतिमंदिरात चाललेल्या या संगीत महोत्सवाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी प्रथम सत्रात सतारवादक आणि बहुआयामी संगीतकार असद खान यांनी राग पुरिया कल्याण सादर केला. आलापीच्या सुरुवातीलाच सारेनिसा, निधनि ही सुरावट घेऊन केलेला मंद्र निषादावरचा न्यास रसिकमनास सुखावून गेला. मोजक्या मनमोहक आलापीतून पुरिया कल्याणला आवाहन करून त्यांनी विलंबित व द्रुत त्रितालमधील दोन स्वररचना सादर केल्या. गायकी अंगाने त्यांनी आपले सतारवादन सादर केले. त्यांची गमकयुक्तशैली, आक्रमक व लडिवाळ अशा दोन्ही शैलीच्या बहारदार अदाकारीला उस्ताद अक्रम खान यांची दमदार साथसंगत लाभली. तबलावादनातील ‘अजराडा बाजाचे’ बोल, क्वचित अनाघाती तर क्वचित घणाघाती सम कधी अतिगतिमान तर कधी संयमित अशा तबलावादन व सतारीचे झंकार यांचा सूरलयताल असा संगम रसिकांनी अनुभवला.
जुगलबंदी संवादात अक्रम खान यांनी केवळ डग्ग्यावर वाजवलेले सतारीचे सूर ऐकून रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर त्यांनी राग शंकरातील द्रुत एक तालातील रचना सादर केली. त्यांच्या वादनातून रसिकांना ऋतू वसंताची अनुभूती मिळाली. सेहरा प्रकार सादर करताना शंकरामध्ये बिहागचे स्वरांचे बेमालूम मिश्रण करून त्यांनी रसिकांना सुखद धक्का दिला.
दुसऱ्या सत्राचा प्रारंभ पद्मश्री पं. एम. व्यंकटेशकुमार यांनी राग दुर्गा सादर करून केला. ‘तू जी न बोलो’ ही विलंबित एकतालातील बंदिश सादर केली. सावकाश बढत करत केलेल्या आलापीने दुर्गाच्या स्वरांनी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. त्यानंतर त्यांनी द्रुत त्रितालमध्ये ‘माता भवानी काली दुर्गा गौरी, विघनहारिणी तारिणी’ ही बंदिश सादर केली. यानंतर द्रुत त्रितालातील ‘नादिर दिम दिम तदारे दानी’ हा तराना विलक्षण लयकारीने सादर केला. त्यानंतर त्यांनी ‘राजन के राजा शिरीरामचंद्र’ कान्हडा व मालकंस या दोन्ही रागांचे मिश्रण असणारा राग कौशीकान्हडा सादर केला. ‘का हे करत मोसे बरजोरी’ ही द्रुत त्रितातील बंदिश सादर केली.
कैलाशनाथा गौरी ईशा हे भजन व अक्क केळवा हे कन्नड भजन तर रसिकांच्या आग्रहास्तव ‘ये गं ये गं विठाबाई’ हा अभंग सादर केला. शामसुंदर मदनमोहन या भैरवीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर नागनाथ नागेशी तर तबल्यावर केशव जोशी यांनी रंगतदार साथसंगत केली. तानपुरा व स्वरसाथ- शिवराज पाटील, अर्जुन वठार यांची होती. प्रारंभी डॉ. सुहासिनी शहा, करण शहा, मयुरा दावडा शहा. डॉ. सुधांशु चितळे आणि डॉ. किरण चितळे यांनी कलाकारांचे स्वागत केले.