वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जवळजवळ युती झालेली आहे. याबाबत खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीच माहिती दिली आहे. आता युतीची केवळ औपचारी घोषणा बाकी आहे. या युतीच्या रुपात नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. असे असताना एकेकाळी वंचित बहुजन आघाडीचे सहकारी असलेल्या असदुद्दीन ओवैसी यांनी या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> Maharashtra police recruitment : कडाक्याची थंडी, त्यात निवाऱ्याचा अभाव, पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हाल
“जेव्हापासून भाजपा सत्तेत आलेली आहे तेव्हापासून अल्पयसंख्याक, दलित, आदिवासी समाजाला त्रास होत आहे. या समाजातील लोकांना मारहाण केली जात आहे. मॉब लिंचिंग होत आहे. त्यांची घरं तोडली जात आहे. प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांच्यासोबत होतो. आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो, तेव्हा वंचित समाजाचा विकास व्हावा हाच आमचा उद्देश होता. देशातील वंचिताचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण हवे असेल तर अगोदर त्यांचे राजकीय सशक्तीकरण होणे गरजेचे आहे. आता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले असतील तर मी काय म्हणू शकतो,” अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली.
हेही वाचा >>> चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; म्हणाले, “औरंगजेबजीच्या कबरीवर…”
त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “लव्ह आणि जिहाद हे कधीच सोबत येऊ शकत नाहीत. प्रेम ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. तर जिहाद हादेखील वेगळा आहे. तलवार उचलून कोणालाही मारून टाकणे, म्हणजेच जिहाद असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे आहे. भारतात १८ वर्षे झालेल्या व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती आपल्या मनाने जोडीदार निवडून लग्न करत असेल, तर कोणालाही त्याबाबत आक्षेप नसावा. ज्या-ज्या राज्यात लव्ह जिहादचा कायदा करण्यात आला. ते सर्व कायदे असंवैधानिक असल्याचे न्यायालयाने सांगितलेले आहे,” असे औवैसी म्हणाले.
हेही वाचा >>>माकडांसोबत सेल्फी घेण्याचा मोह जीवावर बेतला! ५०० फूट खोल दरीत कोसळून प्रवाशाचा मृत्यू
वंचित आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील युतीवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. त्यांनी आम्ही आगामी महापालिकेच्या निवडणुका सोबत लढवणार आहोत, असे सांगितले आहे. “शिवसेना आणि आमच्यातच बोलणी सुरू आहे. दोघांनीही एकमेकांना शब्द दिला आहे की, आपल्याला आगामी महापालिका निवडणुकीस एकत्रितपणे सामोरं जायचं आहे आणि पुढील निवडणुका आल्यातर त्या निवडणुकाही एकत्रितपणे लढायच्या आहेत. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीत यांच्या बोलणी करणाऱ्यांमध्ये निर्णय झाला असल्याची सध्याची परिस्थिती आहे,” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.