एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांचं नुकतंच बुलढाणा येथे भाषण झालं आहे. या भाषणात औरंगजेबच्या नावानं घोषणाबाजी झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबतचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.
या घडामोडींनंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा येथील सभेत अशाप्रकारची कोणतीही घोषणाबाजी झाली नाही, अशी माहिती असदुद्दीन ओवेसी यांनी दिली. खोट्या बातम्या प्रसारित करण्यावरून त्यांनी प्रसारमाध्यमांवरही संताप व्यक्त केला.
बुलढाणा येथील सभेत कथित औरंगजेबाच्या घोषणाबाजीबद्दल विचारलं असता असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला. “तुम्ही किती खोट्या बातम्या पसरवाल? मुस्लिमांचा किती द्वेष कराल? तुम्ही खोट्या बातम्या का चालवत आहात? तुम्ही घोषणा ऐकल्या आहेत का? तिथे पोलीस नव्हते का?” अशी संतप्त प्रतिक्रिया ओवैसी यांनी दिली.
हेही वाचा- VIDEO: “देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येही नाही, इथले मुस्लीम…”, फडणवीसांचा हल्लाबोल
दरम्यान, या कथित घोषणाबाजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सातत्याने म्हणतो आहे की, या ‘औरंग्याच्या औलादी’ कुठून पैदा झाल्या? महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येही नाही. या ठिकाणचे मुस्लीमही औरंगजेबाचे वंशज नाहीत. औरंगजेब या देशावर राज्य करण्यासाठी, हिंदुंवर अत्याचार करण्यासाठी, आमच्या माताबहिणींची अब्रु लुटण्यासाठी आला होता. त्यामुळे औरंगजेब कुठल्याही राष्ट्रीय मुसलमानाचा मानक होऊ शकत नाही. त्यामुळे जे अशा घोषणा देत आहेत त्या औरंग्याच्या औलादी कोण आहेत, त्यामागे कोण आहे, त्यांचा हेतू काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छित आहेत हे लवकरच बाहेर येईल.”