Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात २८८ विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रचार सुरु केला आहे. तसंच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींचा ( Asaduddin Owaisi ) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
ओवैसींचा हा व्हिडीओ महाराष्ट्रातील संभाजी नगर येथील आहे. त्यात ते म्हणत आहेत की, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देऊ इच्छितो की जर न्याय राहिला तर भारत सेफ राहिल. संविधान जिवंत राहिलं तर सन्मान राहिल आणि आंबेडकर जिवंत राहिले तर गोडसे मृत असेल.” असं असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi ) त्यांच्या भाषणांत म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी प्रचारसभा महाराष्ट्र निवडणुकीच्या अनुषंगाने घेतली त्यात त्यांनी ‘एक है तो सेफ है’ हा नारा दिला होता. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे जेव्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनीही ‘बटेंगें तो कटेंगे’ असं म्हणत सगळ्यांनी निवडणुकीत एकोपा दाखवला पाहिजे असं म्हटलं होतं. यावर बोलत असताना ओवैसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिलं आहे. ओवैसी म्हणाले, महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांना मानणारे लोक आहेत याची आम्हाला कल्पना आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओवैसी असा वाद पेटवू इच्छितात. मी आमच्या ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की या कटात तुम्ही फसू नका. आम्हीही निवडणूक लढवत आहोत पण आम्ही प्रेम, आपुलकीच्या गोष्टीही करतो हे लक्षात घ्या असंही ओवैसी ( Asaduddin Owaisi ) म्हणाले.
हे पण वाचा- Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
नांदेडच्या सभेत मोदी काय म्हणाले होते?
नांदेड या ठिकाणी मोदींची सभा शनिवारी (९ नोव्हेंबरला) पार पडली. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है असा नारा दिला होता. तसंच काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस पक्ष आणि इतर विरोधी पक्ष हे मागासवर्गाला विभाजित कऱण्याचं काम करत आहेत असा आरोप नांदेडच्या भाषणांत नरेंद्र मोदींनी केला. तसंच ते म्हणाले एक ओबीसी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी बसला आहे हे काँग्रेसला सहन होणारं नाही, त्यामुळे त्यांनी धर्मांमध्ये फूट पाडणं सुरु केलं आहे. यानंतर ओवैसी ( Asaduddin Owaisi ) यांनी दिलेलं उत्तर हे चर्चेत आलं आहे.