औरंगबादमधून पुन्हा एकदा इम्तियाज जलीलच निवडून येतील असा विश्वास एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे. तसंच यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले ओवैसी?

औरंगाबाद मधून पुन्हा एकदा इम्तियाज जलील हेच दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून जातील असा विश्वास असद उद्दिन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे… प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमची कुठलीही चर्चा झालेली नाही. मी आधीही हेच सांगत होतो आणि आत्ताही हेच सांगतो आहे की इम्तियाज जलील चांगलं काम करत आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांसाठी आणि पक्षासाठीही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे या जागेवरुनन ते पुन्हा निवडून येतील. असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

इलेक्टोरल बाँडबाबत काय म्हणाले ओवैसी?

“मोठमोठ्या कंपन्यांनी ८ हजार कोटी मोदींच्या पक्षाला दिले. १७०० ते १८०० कोटी हे काँग्रेसला दिले. बिजू जनता दल, समाजवादी पक्ष तसंच इतर पक्षांनाही हे पैसे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देण्यात आले. आम्हाला बी टीम म्हटलं जातं पण आम्हाला तर एक पैसाही मिळाला नाही.” असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊत यांना उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे औरंगजेबाप्रमाणे आहेत अशी टीका उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केली होती. त्यावर विचारलं असता ओवैसी म्हणाले, महात्मा गांधींना ज्याने ठार केलं त्या नथुराम गोडसेचा जन्म कुठे झाला? मुंबईत जेव्हा दंगल उसळली आणि हिंदू मुस्लिम मारले गेले त्यांना मारणारे कुठे जन्माला आले होते? भिवंडीत हिंदू-मुस्लिम मारले गेले त्यांना मारणारे कुठे जन्माला आले होते? याचाही विचार करावा लागेल. आम्हाला शांतता हवी आहे, हिंसा नको. असंही यावेळी ओवैसी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi imp statement about electoral bonds and bjp what did he say rno news scj