लातूरमध्ये मुस्लीम, दलित, ओबीसी ऐक्याचा प्रयोग; प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस-इ-इतेहादूल मुस्लीमन या पक्षाचे नाव घेतल्यावर मुस्लिमांचा पक्ष म्हणून चित्र उभे राहते. पण पुढील महिन्यात होणाऱ्या लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाने मुस्लीम, दलित, इतर मागासवर्गीयांच्या ऐक्याचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. दोनच दिवसांपूर्वी लातूर शहरात झालेल्या खासदार असेउद्दिन ओवेसी यांच्या सभेला मिळालेल्या प्रतिसादानंतर बदलाचे वारे वाहणार, असेच संकेत मिळू लागले आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडी, एमआयएम व शेतकरी संघटनेच्यावतीने शहरातील टाऊन हॉलच्या मदानावर या आठवडय़ात झालेल्या सभेस लातूरकरांची मोठी गर्दी झाली होती. अलीकडच्या काळात लोक जमवण्यासाठी एकही पसा खर्च न करता एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झालेली कदाचित ही पहिलीच सभा असेल. नगरपालिका व महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएमने लातूर जिल्हय़ातील उदगीर येथे, शेजारच्या बीड शहरात व महापालिका निवडणुकीत सोलापुरात आपले अस्तित्व दाखवून दिले. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होऊ घातलेल्या लातूर महापालिका निवडणुकीत एमआयएम विविध समविचारी पक्षांना सोबत घेऊन आपला आवाका वाढवत निवडणुकीच्या िरगणात उतरणार असल्याचे प्रचारसभेतून जाहीर केले. आगामी काळात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही आघाडी केली जाणार आहे. परिवर्तन आघाडीच्यावतीने लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीत एमआयएम सक्षम पर्याय उभे करण्याच्या विचारात आहे. मुस्लीम, दलित, ओबीसी एकत्र आले तर परिवर्तन होऊ शकते असा विश्वास महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील व एमआयएमच्या ओवेसी यांना वाटतो आहे.

लातूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे पावणेतीन लाख मतदारसंख्या राहील. त्यात दलित, मुस्लिमांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक   आहे. या निवडणुकीत १८ प्रभागांतून मिळून ७० नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. शहरातील सहा प्रभागांत मुस्लीम व दलित यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे ७० पकी तब्बल २४ नगरसेवकांचे भवितव्य दलित, मुस्लीम मतांवर अवलंबून राहणार आहे. शहरातील लेबर कॉलनी, अंजलीनगर, आनंदनगर, बरकतनगर, इकबाल चौक, पटेल चौक, सुरत शहावली दर्गा, खोरीगल्ली, रियाज कॉलनी, चौधरीनगर, बौद्धनगर, अन्सार कॉलनी, सिद्धार्थ सोसायटी, तुळजाभवानी नगर, संजयनगर, इंदिरानगर हे ते प्रमुख भाग आहेत.

दलित व मुस्लीम एकत्र आले व त्याला ओबीसीची साथ मिळाली तर मोठा चमत्कार घडू शकतो. उदगीर शहरात पहिल्यांदाच एमआयएमचे सहा नगरसेवक तर बीडमध्ये नऊ नगरसेवक निवडून आले. योग्य नियोजन केले तर महापौर कोणाचा होणार? हे ठरवण्याइतक्या जागा परिवर्तन आघाडीला मिळू शकतात हे हेरून ओवेसी यांची सभा झाली. लातूर महापालिकेत व पूर्वीच्या नगरपालिकेत अनेक वष्रे एकहाती काँग्रेसचीच सत्ता राहिली. मुस्लीम व दलित मताचा काँग्रेसने आपल्या सोयीनुसार वापर करून घेतला मात्र त्यांच्या विकासासाठी नेमके पाऊल उचलले नसल्याचा आरोप ओवेसी यांनी या सभेत केला.

आपल्या भाषणात त्यांनी आठ वष्रे राज्याचे मुख्यमंत्रिपद ज्या शहराकडे होते त्या शहरवासीयांना पिण्याचे हक्काचे पाणी मिळत नाही. यावर्षी एवढा पाऊस होऊनही आठ दिवसांतून एकदा पाणी दिले जाते. त्यातही मुस्लीम वस्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. मुस्लीम वस्तीत गटारी नाहीत, रस्ते नीट नाहीत. राज्यातील मुस्लिमांच्या साक्षरतेचे प्रमाण ७८.१ टक्के तर लातुरातील प्रमाण ६९ टक्के, प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुस्लिमांचे राज्यातील प्रमाण ७९.३ टक्के तर लातुरात ३५ टक्के, माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण ५२.२ टक्के तर लातुरात केवळ ५.९ टक्के आहे. शौचालयाचा वापर करणाऱ्या मुस्लीम कुटुंबीयांचे राज्यातील प्रमाण ३५ टक्के तर लातुरात १९.४ टक्के  असल्याची माहिती देत ओवेसी यांनी मुस्लीम विकासात कसे मागे आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

मुस्लीम समाजाची लातूरमध्ये का उपेक्षा केली जाते आहे, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी येथील सत्ताधाऱ्यांनी का प्रयत्न केले नाहीत, असे सवाल उपस्थित करून मुस्लीम समाजाच्या भावनेला ओवेसी यांनी हात घातला. काँग्रेस धर्मनिरपेक्षतेची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात जातीयवादी भूमिका काँग्रेसने कशी घेतली याची उदाहरणेही त्यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सर्वात आघाडी घेण्याचे काम एमआयएमच्या पुढाकाराने झाले. एकही सदस्य महापालिकेत नसलेला भाजप झिरोवरून हिरो ठरण्याची भाषा करतो आहे, तर ७० पैकी ४९ नगरसेवक असलेला काँग्रेस पक्ष सत्ता राहील की नाही या साशंकतेत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होईल का? भाजपच्या गळाला योग्य उमेदवार लागतील का? व काँग्रेसविरोधी निर्माण झालेल्या वातावरणाचा योग्य लाभ उठवण्यासाठी परिवर्तन आघाडी प्रत्येक प्रभागापर्यंत वातावरण निर्माण करेल का? परिवर्तन आघाडीच्या प्रवेशामुळे ते किती नगरसेवक निवडून आणतील यापेक्षा ते कोणत्या पक्षाच्या नगरसेवकाला पराभूत करतील याची चर्चाही महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच सुरू झाली आहे.

  • लातूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सुमारे पावणेतीन लाख मतदारसंख्या राहील. त्यात दलित, मुस्लिमांची संख्या एक लाखांपेक्षा अधिक आहे.
  • या निवडणुकीत १८ प्रभागांतून मिळून ७० नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. शहरातील सहा प्रभागांत मुस्लीम व दलित यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे ७० पकी तब्बल २४ नगरसेवकांचे भवितव्य दलित, मुस्लीम मतांवर अवलंबून राहणार आहे
  • उदगीर शहरात पहिल्यांदाच एमआयएमचे सहा नगरसेवक तर बीडमध्ये नऊ नगरसेवक निवडून आले.

लातूरमध्ये मुस्लीम, दलित, ओबीसी अशी एकी करून निवडणूक लढविण्यात येणार आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल.  आमदार इम्तियाज जलिल, आमदार, एमआयएम

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi mim prakash ambedkar
Show comments