एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांचे प्रतिपादन

धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांमधून विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य नेटाने केले जात आहे. शिक्षणाला इस्लाममध्ये महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठीच धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांना बळकट करण्याची गरज आहे. मदरशांमधून देशप्रेमाचेच धडे दिले जातात; पण मुस्लिमांना बदनाम करण्यासाठी मदरशांमधून अतिरेकी बनवण्याचे शिक्षण दिले जाते, असा  अपप्रचार केला जातो. मुसलमान हेच या देशाचे खरे देशभक्त आहेत, असे प्रतिपादन एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुउद्दीन ओवेसी यांनी केले.

अलफलाह इंटरनॅशनल इस्लामिक स्कूलचे उद्घाटन ओवेसी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील या वेळी उपस्थित होते. शिक्षण ही मोठी संपत्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला धार्मिक आणि सामाजिक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाशिवाय माणूस खऱ्या अर्थाने माणूस होऊ शकत नाही. १८५७ मध्ये सर्वप्रथम इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन मदरशांमधूनच मौलांनानी सुरू केले होते. आज आम्हालाच या देशात देशभक्तीचा पुरावा मागितला जातो हा मुस्लीम समाजावर अन्याय आहे, असेही ओवेसी म्हणाले.

आमदार जलील यांनी महाराष्ट्र आणि देशात मुस्लीम समाज शिक्षणात मागे पडत चालला असून शाळा सोडण्याचे प्रमाण मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुस्लिमांनी जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अलफलाह इंटरनॅशनल इस्लामिक स्कूलचे संचालक सोहेल यांनी स्कूलमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देऊन मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. सीबीएससीच्या धर्तीवर हे शिक्षण दिले जात असल्याचे ते म्हणाले. १९९० पासून नोमोनिया मदरसा येथे मराठीचे शिक्षणही दिले जात असल्याची माहिती दारुउलम नोमानियाचे अध्यक्ष मौलाना महेफुजूल रहेमान खान यांनी दिली.

 

 

Story img Loader