ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (२ जानेवारी) हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मलंगगडाला मुक्त करण्याचं आश्वासन दिलं. मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लीम समाजांत गेल्या अनेक वर्षांपासून वाद चालू आहे. मलंगगडावर सध्या हाजी मलंग हा दर्गा आहे. परंतु, हिंदू समुदायाने अनेकदा दावा केला आहे की या ठिकाणी पूर्वी मंदिर होतं. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. शिवसेना (दोन्ही गट) आणि स्थानिक हिंदू संघटनांचं हे आंदोलन अजूनही चालू आहे. या आंदोलनाचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मलंगगड मुक्तीचं आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारने केलेल्या कारवाईचं उदाहरण दिलं.
एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओवैसी यांनी प्रसारमाध्यमांसमोर एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. तसेच ते म्हणाले, एकनाथ शिंदे दर्ग्यावर कारवाई करणार आहेत. बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यां लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे, सातत्याने चिथावणीखोर भाषणे दिली जात आहेत.
ओवैसी म्हणाले, भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे म्हणतायत की ते हाजी मलंग दर्गा हटवणार आहेत. २०० ते ३०० वर्ष जुन्या दर्ग्याबाबत ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत. एखादे मुख्यमंत्री अशा प्रकारचं वक्तव्य कसे काय करू शकतात? तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुमच्या नजरेत सगळे धर्म सारखे असले पाहिजेत. हिदू असो, मुस्लीम, ख्रिस्ती अथवा बौद्ध असो, तुमच्यासाठी सगळे सारखे असायला हवेत. मुख्यमंत्री असूनही तुम्ही अशी निरर्थक वक्तव्ये का करताय?
हे ही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांना जर आता एवढी हिंमत आली असेल तर…”, ओवेसींचं टीकास्र; बाबरीचा उल्लेख करत म्हणाले…
एआयएमआयएमचे खासदार म्हणाले, अलीकडच्या काळात यांचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. बाबरी मशिदीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हे लोक अशी वक्तव्ये करू लागले आहेत. त्या निकालानंतर देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. चिथावणीखोर वक्तव्ये वाढली आहेत. लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री अशा प्रकारची वक्तव्ये सतत्याने करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी आहे की त्यांनी सर्वांसमोर त्यांच्या सरकारचं धोरण स्पष्ट करावं.