बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला ६ डिसेंबरला २३ वर्षे झाली. मुंबई स्फोटातील आरोपींना फाशी दिली; मात्र बाबरी प्रकरणातील दोषींना उलट चांगली पदे दिली, त्यांना शिक्षा केलीचं नाही. राम मंदिराचा मुद्दा अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहिलेले राममंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र, एक दिवस बाबरी मशीद नक्की होईल, असा विश्वास ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. औरंगाबाद येथील सभेत ते बोलत होते. यावेळी ओवेसींनी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेवरही जोरदार टीका केली. तसेच इसिसचा मुस्लीम समाजाशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
ओवेसी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार केली नसती, तर हा देश हिंदू राष्ट्र झाला असता. राजकारणात व्यक्तीपूजा म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल असते. देशात आणि राज्यात दलित-मुस्लिमांचे ऐक्य करून हे सर्व जगाला दाखवू देऊत. काँग्रेस, भाजप हे दलित-मुस्लिमांना एकत्र येऊ देत नाहीत. आम्ही भडकावू भाषण देत असल्याचा आरोप केला जातो; मात्र आम्ही फक्त तुम्ही केलेल्या अन्यायाला चव्हाट्यावर आणत आलो आहोत. डॉ. बाबासाहेब यांनी देश सोडला नाही, हे सांगता मग बाबासाहेबांनी धर्म सोडला, हे का सांगत नाहीत? असा सवालही असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना केला.
इसिसचा मुस्लीम समाजाशी काहीही संबंध नाही. इसिसने दीड लाख मुस्लिमांची कत्तल केली आहे. प्रत्येक दहशतवाद्यांचा आम्ही निषेधच करतो. मात्र, इसिसला बॉम्बने संपवता येणार नसून त्यांचा विचार संपवला पाहिजे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा