अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आसारामबापू यांना अनावृत पत्र पाठवून मंत्रांच्या साहाय्याने पाऊस पाडण्याचे आव्हान देण्यात आले आहे. मंत्रशक्तीने पाऊस पाडण्याचा आणि हवेची दिशा बदलण्याचा दावा आसारामबापूंनी गुरुवारी दूरचित्रवाहिन्यांवर केला होता. समितीने कोणताही चमत्कार सिद्ध करणाऱ्याला १५ लाख रुपये देण्याचे कबूल केले आहे, मात्र समितीच्या १५ लाख रुपयांची फारशी गरज आसारामबापू यांना नसून त्यांनी केवळ शेतकऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मंत्रांनी पाऊस पडणार असेल तर सरकार त्यांच्या उपक्रमाला सर्वतोपरी मदत करायला सहज तयार होईल. मंत्रांच्या सामर्थ्यांमुळे लोकांना पुरापासूनही वाचवता येईल. ज्या शक्तीचा आसारामबापू दावा करीत आहेत ती शक्ती भूकंपापासूनही संरक्षण करू शकेल. त्सुनामी आणि सागरी तुफानांच्या वेळी त्यांनी अशी सूचना दिली असती तर पुढील हानी टाळता येऊ शकली असती. या सर्व आपत्तीच्या वेळी आसारामबापू संकटमोचन असल्याचे सिद्ध झाले असते, असे उपरोधिक पत्र समितीकडून आसारामबापू यांना पाठवण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा