एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. कृषीसह शिक्षण क्षेत्रासाठीदेखील अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढ केली असल्याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने आशा स्वयंसेविकांचे मानधन ३,५०० रुपयांवरुन ५,००० रुपये इतकं वाढवलं आहे. तर गटप्रवर्तकांचे मानधन ४,७०० रुपयांवरुन ६,२०० रुपये इतकं वाढवलं आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८,३२५ रुपयांवरुन १०,००० रुपये इतकं वाढवण्यात आलं आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५,९७५ रुपयांवरुन ७,२०० रुपये रुपये इतकं वाढवलं आहे. यासोबतच अंगणवाडी मदतनिसांचे मानधनदेखील वाढवले आहे. मदतनिसांना आता दरमाहा ४,४२५ रुपयांवरुन ५,५०० रुपये इतकं मानधन मिळेल.
हे ही वाचा >> फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांचा राज्य सरकारला टोला
रिक्त पदे भरली जाणार!
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यासह या विभागातील रिक्त पदे देखील भरण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २०,००० रिक्त पदे भरली जाणार आहेत. तसेच अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली निर्माण केली जाणार आहे.