पंढरपूर: बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आंबेगाव येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे, ( वय ५५ ) वर्षे, सौ. आशाबाई बाळू अहिरे ( वय ५० ) यांना मानाचा वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवतडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : “…तर आम्ही खपवून घेणार नाही”, मंत्री अब्दुल सत्तार यांचा कोणाला इशारा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी, कामगार व कष्टकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनेच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी २५ ते ३० टक्के वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे त्यामुळे सर्वत्र एक भक्तीमय वातावरण झालेले आहे. शासनाने वारकरी महामंडळाची स्थापना केली असून वारीतील दिंड्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रशासनाला आषाढी वारीनिमित्त देण्यात येणाऱ्या निधीमध्ये तिपटीने वाढ केलेली आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनेच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : Raj Thackeray : “हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे”, सद्यस्थितीवर टीका करत राज ठाकरेंचे विठूरायाकडे साकडे!

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाखाचा निधी मंजूर केलेले आहे. या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेल्या १०३ कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दरम्यान, शासकीय महापुजेला मानाचा वारकरी म्हणून मान मिळालेले बाळू शंकर अहिरे, व सौ. आशाबाई बाळू अहिरे यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना एक वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. हे मानाचे वारकरी मागील १६ वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, देहू यांना एक लाखाचा प्रथम पुरस्कार मिळाला. दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, इंदापूर यांना ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi 2024 cm eknath shinde mahapuja 103 crores sanctioned for darshan mandap and tokan darshan css
Show comments