सोलापूर : ऊन-वारा-पाऊस अंगावर झेलत आणि वाटेत गावोगावी हजारो भाविकांचे स्वागत, सेवा स्वीकारत मजल दरमजल करीत निघालेल्या श्रीक्षेत्र शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानाचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला. पंढरीच्या राणाला भेटण्यासाठी आतूर झालेला शेगावचा राणा तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचताच त्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. रात्री उळे गावात मुक्काम करून उद्या बुधवारी हा पालखी सोहळा सोलापूर शहरात दाखल होणार आहे.
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठल दर्शनाची आस घेऊन लाखो वारक-यांच्या दळभारासह अनेक संतांच्या पालखी सोहळे, दिंड्या पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यापैकी शेगावच्या संत श्री गजानन महाराज संस्थानाच्या पालखी सोहळ्याचे महत्व वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. गेल्या १३ जून रोजी शेगाव येथून प्रस्थान ठेवलेला हा पालखी सोहळा सुमारे ७५० किलोमीटर पायी चालत पंढरपूरला जाणार आहे.
हेही वाचा : कराड: मद्यधुंद हुल्लडबाजांकडून वनमजुराला जबर मारहाण, प्रसिद्ध ओझर्डे धबधबा येथील खळबळजनक घटना
धाराशिव, तुळजापूरमार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी तामलवाडी येथे धाराशिव जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याला निरोप दिला आणि नंतर सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवताच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांनी प्रशासनाच्यावतीने शेगावचा राणा भक्तिमय वातावरणात स्वागत केले. माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनीही पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले. रात्री पालखी सोहाळ उळे गावी विसावला.
हेही वाचा : सोलापूर: खोट्या लग्नासाठी पैशाच्या आमिषाने तरूणीला राजी करून फसवणूक
उद्या बुधवारी सकाळी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा ‘ गण गण गणात बोते ‘चा उद्घोष आणि टाळमृदुंगाचा गजर करीत हा पालखी सोहळा शहरात रूपाभवानी मंदिराजवळील पाणी गिरणी चौकात पोहोचल्यानंतर तेथे स्वागत होणार आहे. शहरात दोन दिवस मुक्काम करून तिस-या दिवशी शेगावचा राणा मंगळवेढामार्गे पंढरपूरच्या दिशेने पाऊलवाट ठेवणार आहे.