फलटण: पांडुरंगाच्या भेटीची ओढ, ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठुरायाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीकडे निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी महानुभाव आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशीत ऐतिहासिक फलटण नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत झाले.
तरडगाव येथील पालखी तळावरून सकाळी सोहळ्याच्या प्रस्थानानंतर हा सोहळा सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेऊन व गावोगावी स्वागत स्वीकारून पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांसोबत सायंकाळी फलटण शहरात दाखल झाला. या वेळी शहराच्या हद्दीवर प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि नागरिकांनी सोहळ्याचे स्वागत केले. आज माऊलींचा रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. त्यामुळे पालखी रथ सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. महानुभाव आणि जैन धर्मियांच्या दक्षिण काशीत फलटण शहरात पालखी सोहळ्याचे मोठे स्वागत होत आहे. निंभोरे येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माऊलीचे दर्शन घेऊन रथाचे काही वेळ स्वारथ्य केले. वडजल येथे ग्रामस्थांनी स्वागत केले.
हेही वाचा : शेगावचा राणा सोलापूर जिल्ह्यात दाखल; भक्तिमय वातावरणात स्वागत
माउलींचा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो सगुणामातानगर (मलठण) सदगुरू हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक राम मंदिराजवळ आला. या वेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टतर्फे मान्यवरांनी स्वागत केले. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका यामुळे अवघे फलटण शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य दिसून येत आहे.
गोड तुझे रुप
गोड तुझे नाम
देई मज प्रेम सर्वकाळी
विठा माऊली हाच वर देई
संचोरुणी राही हृदयामाजी
तुका म्हणे काही न मागे आणि
तुझे पायी सुख सर्व आहे
असा अभंग सोहळ्यातील दिंडीत गायला जात होता. विठठल नामाच्या जयघोषात सर्व दिंड्या फलटण विमान तळावर पोहोचल्या. पालखी तळावर चोपदारांनी दंड उंचावल्यावर सर्वत्र शांतता झाली. चोपदारांनी सूचना केल्या. समाज आरती होऊन पालखी सोहळा फलटणनगरीत विसावला. फलटण पालिकेच्या वतीने वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : कराड: मद्यधुंद हुल्लडबाजांकडून वनमजुराला जबर मारहाण, प्रसिद्ध ओझर्डे धबधबा येथील खळबळजनक घटना
बुधवारी फलटण येथून सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान बरकडे ( फलटण )होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेऊन हा सोहळा साताऱ्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. शनिवारी हा वैष्णवांचा मेळा दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.