महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आषाढी वारी संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही आषाढी वारीचा सोहळा करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केवळ १० पालख्यांनाच वारी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या दहा पालख्या २० बसेसच्या माध्यमातून पंढरपुरात पोहोचतील. मुख्य मंदिर मात्र भाविकांसाठी आणि दर्शनासाठी बंदच असणार आहे. सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल, त्याचबरोबर सर्व सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी आवश्यक असणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

हेही वाचा- पुणेकरांना दिलासा पण…; मॉल्स उघडणार, दुकानं ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय

प्रत्येक पालखीसाठी ४० वारकऱ्यांना परवानगी असून पायी पालखीला मात्र यंदाच्या वर्षीही परवानगी नसल्याचं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तर शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्याचबरोबर रिंगण आणि रथोत्सवासाठी १५ वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर देहू, आळंदी प्रस्थान सोहळ्याला फक्त १०० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader