विश्वास पवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरडगाव:माउली, माउलीचा जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि जोडीला हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणार्‍या वारकर्‍यांच्या जोशात  दंग झालेला वैष्णवांचा मेळा आणि अश्वांनी केलेली दौड अशा पद्धतीने पार पडलेल्या वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाने उपस्थितासह वारकर्‍यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब तरडगावात पार पडले.

हेही वाचा >>> सांगली: मिरजेतील औषध निर्मिती कारखान्याला आग, दोन लाखांचं नुकसान

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याने लोणंदला दुपारी बारा वाजता पालखी तळावर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगावाजताच माउलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. लोणंदकर नागरिक महिला भाविकांनी सरहदच्या ओढ्यापर्यत परंपरेप्रमाणे येत माउलींचा पालखीला निरोप दिला .दुपारी अडीच वाजता सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश करताच वाद्यांच्या गजरात आमदार दिपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, सभापती प्रतिभा धुमाळ, प्रांताधिकारी सचिन ढोलेतहसीलदार अभिजित जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले.

सोहळा दुपारी साडेतीन वाजता चांदोबाचा लिंब येथे पोहोचला. तेव्हा पुढील दिंडीत असलेले वारकरी भारूड, भजने, गात धार्मिकतेचा आनंद लुटत होते. पालखी चांदोबाचा लिंब येथे आल्यावर राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार यांनी वारीतील पहिले उभे रिंगण लाऊन घेतले. दरम्यान दिंडीकऱ्यांनी चढाओढीने अभंगाच्या ताना मारत वातावरण अधिक भक्तिमय करण्यात आनंद मानला. दुसरीकडे अश्व धावणार असलेल्या मार्गावर रंगावलीच्या स्वयंसेवकांनी रंगीबेरंगी रांगोळी घालुन वातावरणात अधिक प्रसन्नता आणली.

हेही वाचा >>> सोलापूर: अवैध वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न; ग्रामपंचायत सदस्यावर हल्ला

सर्व दिंडीकरांचा टाळ मृदंगाच्या आवाजात माउलींचा होत असलेला गजर सुरू असतानाच पालखी रथा पुढील २७ दिंड्या पार करत रथाच्या दिशेने दौडत आले.समोर स्वाराचा अश्व आणि मागे माऊलींचा अश्व माउलींच्या जयघोषात रथामागे २०दिंड्या धावून पुन्हा आलेल्या दोन्ही अश्वांना पाहून वारकरी देहभान विसरून दंग झाले. पाहता पाहता दोन्ही अश्वांनी माऊलींच्या रथाला प्रदक्षिणा घातली व संत ज्ञानेश्वर पादुकांचे दर्शन घेतले. त्यावेळी सेवेकऱ्यांनी अश्वांच्या गळ्यात पुष्पहार घातले व गुळ हरभऱ्याचा शिधा दिला. तेथुन पुन्हा अश्व दौडत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पोहोचताच चोपदारांनी रथावर उभे राहुन हातातील दंड फिरवून रिंगण संपन्न झाल्याचे दर्शवले. यानंतर सोहळा माउलींचा गजर करत पुढे मार्गस्थ झाला. सायंकाळी  सोहळा तरडगावच्या प्रवेशद्वारावर पोहोचला . ग्रामस्थांनी पालखी रथातून खाली उतरवून माऊलीच्या गजरात खांद्यावर घेतली व मेळा वाजत गाजत तरडगावात विसवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi wari ringan ceremony lakhs of devotees in sant dnyaneshwar mauli palkhi ceremony zws