Kurla BEST Bus Accident News : कुर्ला पश्चिम येथे झालेल्या भीषण अपघातात बसचालक संजय मोरे हा संतप्त जमावाच्या हाताशी लागला होता. परंतु, तरीही तो त्यांचया तावडीतून सहीसलामत सुटला. त्यामागे आशिफ हुसैन (३०) याचा खूप मोठा वाटा आहे. त्याने हस्तक्षेप केला नसता तर कदाचित अनर्थ घडू शकला असता. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हुसैन याने मंगळवारी पीटीआयला सांगितलं की, “मी घरी होतो तेव्हा मला मोठा आवाज ऐकू आला. मी बाहेर धाव घेतली आणि पोलीस वाहनात दोन पोलीस जखमी अवस्थेत पडलेले दिसले.” हुसैन यांनी नुकसान झालेल्या वाहनाचा दरवाजा उघडला आणि जखमी पलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परत आल्यानंतर त्याने मित्रांसह पोलिसांच्या एसयूव्हीखाली अडकलेल्या इतर तिघांची सुटका केली. हुसैन म्हणाला की, “एका जमावाने बस चालकावर हल्ला केला. मी हस्तक्षेप केला. लोकांना ड्रायव्हला मारू नका अशी विनंती केली. यात मलाही मार बसला. पण पोलिसांच्या मदतीने आम्ही चालकाला सुरक्षित ठिकाणी आणण्यात यशस्वी झालो.”
जमावाच्या रोषापासून वाचण्याकरता बस कंडक्टर जवळच्या दंतचिकित्सकाच्या दवाखान्यात लपून बसला हता. हुसैनने त्याला नवीन कपडे दिले आणि दुचाकीवरून कुर्ला पोलीस ठाण्यात नेले. “जमाव संतापला होता. आम्ही वळेत पोहोचलो नसतो आणि स्थानिक रहिवाशांनी आम्हाला मदत केली नसती तर ड्रायव्हर आणि कंटक्टरला संतप्त लोकांनी मारून टाकले असते”, असंही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
हेही वाचा >> Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
बुधवारी सेवा बंद
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने बुधवारीही येथील बस सेवा पूर्णपणे बंद ठेवली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थी आणि प्रवाशांना दीड किलोमीटर पायपीट करीत डेपो गाठावा लागला.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
कुर्ला पश्चिमेतील एस.जी. बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल समोर सोमवारी रात्री बेस्ट बस पादचारी आणि वाहनांना चिरडून एका कमानीवर आदळली. या अपघातात सात जण ठार, तर ४९ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुर्ला – अंधेरी दरम्यान धावणाऱ्या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडताच परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक रस्त्यावर सैरावैरा पळू लागले. घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसचालक व वाहकाला ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले. दोघांनाही कुर्ला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यावेळी चालक मोरेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, ११०, ११८(१), ११८(२), ३२४(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोरेला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालायाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.