मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे विराट सभा होत आहे. १४ ऑक्टोबरला या विराट सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशातच भाजपा नेते, आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार जरांगे-पाटलांच्या आंदोलनाचा फायदा स्वत:चा संपलेला पक्ष उभारण्यासाठी करत आहेत, असा आरोप आशिष देशमुखांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आशिष देशमुख म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील सर्व ठिकाणी फिरत आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा अरविंद केजरीवालांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी केला. त्याच पद्धतीनं शरद पवार जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा स्वत:चा संपलेला पक्ष उभारण्यासाठी करत आहेत.”
“राज्यातील विविध जातींमध्ये सलोखा असणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं शरद पवार प्रयत्न करत नाहीत. विविध समाजांमध्ये द्वेषाची भावना वाढवून आपली पोळी भाजण्याचं काम शरद पवार करत आहेत,” असा आरोपही आशिष देशमुखांनी केला आहे.
हेही वाचा :“मी बातम्यांसाठी आंदोलन करत नाही, लोकांना…”, पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ आमने-सामने आले आहेत. “अंतरवाली येथील सभेला ७ कोटी रूपये कुठून आले?” असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता. याला जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भुजबळांना कुणी सांगितलं ७ कोटी रूपये जमा झाले आहेत. भुजबळांना डिझेल टाकण्यासाठी एक-दोन हजार रूपये पाहिजेत का? भुजबळ काहीही बोलत आहेत. भुजबळांना काही झालं असेल, तर सरकारनं त्यांना लवकर रूग्णालयात नेलं पाहिजे,” असा टोला जरांगे पाटलांनी लगावला आहे.