काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सूचक वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात दिसतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, भाजपा नेते आणि भाजपाच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रमुख आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आशिष देशमुख हे आधी काँग्रेसचे नेते होते. परंतु, काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा दावा केला होता की, त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते भाजपात येतील. देशमुख यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या दाव्याचा पुनरुच्चार केला.

आशिष देशमुख म्हणाले, काँग्रेसकडे जोवर नाना पटोले यांच्यासारखा प्रदेशाध्यक्ष आहे तोवर तिकडे अशीच परिस्थिती असेल. त्यांच्या कारभाराला कंटाळून, त्रस्त होऊन काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते हे लवकच काँग्रेसला सोडचिट्ठी देताना पाहायला मिळतील. शेवटी नाना पटोलेंच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात काँग्रेस ही नामशेष झालेली पाहायला मिळेल. आगामी काळात नक्कीच अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून जातील. त्यावर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांवर लवकरच निवडणूक होणार आहे. या सहा जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकतील.

अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तशी पत्रं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे. त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh explains why ashok chavan quits congress can join bjp asc