काँग्रेस, भाजपा पुन्हा काँग्रेस असा प्रवास केलेल्या आशिष देशमुख यांनी आता पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यापासून त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.अखेर आज (१८ जून) ते भाजपात सामील झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष देशमुख यांनी भाजपा प्रवेशाआधी शनिवारी (१७ जून) केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. यावेळी ते म्हटले होते, “मी कुठल्याही पदाची मागणी केली नाही. मी कार्यकर्ता म्हणून आणि पक्ष जी जबाबदारी देईल ते करत राहणार आहे. श्रद्धा आणि सबुरीनेच माझी पुढील राजकीय वाटचाल राहील. माझी राजकीय वाटचाल कोण्या एका मतदारसंघासाठी केली नाही. विदर्भाच्या हितासाठी मी काम करणार आहे.”

“पक्षातील पुढील वाटचाल संयमाने श्रद्धा आणि सबुरीने राहणार”

“२००९ मध्ये नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष असताना माझा प्रवेश भाजपामध्ये झाला होता. पश्चिम नागपूरमधून मला उमेदवारी देऊ केली होती. नितीन गडकरी माझ्यासाठी पितृतुल्य आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. पक्षातील पुढील वाटचाल संयमाने श्रद्धा आणि सबुरीने राहणार आहे,” असेही देशमुख यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाची मदार ‘आयारामां’वर

दरम्यान, काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले होते. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते. तेच देशमुख यांच्या अंगलट आले होते.

कोण आहेत आशिष देशमुख?

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष देशमुख हे पुत्र. राजकीय धडे त्यांनी काँग्रेसमध्ये गिरविले. मग त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपात असताना आमदार म्हणून निवडून आले. मात्र, भाजपात त्यांचं पटलं नाही म्हणून आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपा सोडल्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तेथेही अन्य कोणाशी फारसे पटले नाही. आता पुन्हा त्यांनी भाजपाचा मार्ग पत्करला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish deshmukh joins bjp in presence of devendra fadnavis chandrashekhar bawankule pbs
Show comments