ठाण्यात शिंदे गटाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मुद्द्यावरून राजकारण तापत असतानाच खुद्द उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन या महिलेची विचारपूस केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर परखड शब्दांत हल्लाबोल केला. “राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय”, असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाहीत ‘काडतूस’ आहेत” अशी प्रतिक्रिया शेलारांनी दिली. ते ट्वीट करत म्हणाले, “आमचे गृहमंत्री ‘फडतूस’ नाहीत ‘काडतूस’ आहेत. मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला आहे. कोणत्याही मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण अशा खूनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनीच रोवली.”
हेही वाचा- “फडणवीसांनी पुढील ४८ तासांत…”, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं खुलं आव्हान!
“निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरं तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे, असे फडतूस उद्योग कुणी केले उद्धवजी? आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रू मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका”, असंही शेलार म्हणाले.