विधानसभेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. यानिवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचा दावा करण्यात येत असताना आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसबरोबरच ठाकरे गटाचेही आमदार फुटल्याचाही दावा केला आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना महाविकास आघाडीच्या आमदारांची मतं फुटण्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, काँग्रेसबरोबरच ठाकरे गटाचेही दोन आमदार फुटल्याचा दावा शेलार यांनी केला. तसेच त्यांनी संजय राऊतांच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा- VIDEO : “…तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लागू केली असती”, संविधान हत्या दिनाच्या निर्णयावरून संजय राऊतांचं टीकास्र!

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

“महाराष्ट्राच्या राजकारणात अन्य कोणत्याही पक्षाला स्थान मिळू नये, अशी ठाकरे गटाची कार्यपद्धती राहिली आहे. एकीडकडे लोकशाहीच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे लोकशाही विरोधात काम करायचं, अशी ठाकरे गटाची भूमिक आहे, याची अनेक उदाहरणं मागच्या काही दिवसात पुढे आली आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना मदत केली नाही. मुंबईत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांना धाराशाही करण्याचं काम केलं. आता शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवामागेही ठाकरे गटाचा हात आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

ठाकरे गटाचे दोन आमदार फुटल्याचा दावा

पुढे बोलताना त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे दोन आमदार फुटल्याचाही दावा केला. “या निवडणुकीत भाजपाकडे मित्रपक्ष मिळून ११० आमदार होते. मात्र, आम्हाला ११८ मते मिळाली. शिंदे गटाकडे एकूण ४७ मते होती. मात्र, त्यांना ४९ मते मिळाली. तर अजित पवार गटाकडे एकूण ४२ मते होती. मात्र त्यांना एकूण ४७ मते मिळाली. याचा अर्थ महायुतीला एकूण १५ मते जास्तीची मिळाली. यापैकी सात मते काँग्रेसची फुटली असं मानले तरी बाकी ८ मते कोणाची होती? या आठ मतांमध्ये ठाकरे गटाची दोन मते होती. याची आम्हाला १०० टक्के खात्री आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा – काँग्रेसमधल्या ‘त्या’ सात जणांवर संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, “दोन वर्षांपासून …

संजय राऊतांच्या आरोपांनाही दिलं उत्तर

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्या आरोपालाही प्रत्युत्तर दिलं. या निवडणुकीत भाजपाकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत हे खोटी माहिती पसरवण्याचे बादशहा आहेत. आमच्य माहितीनुसार ठाकरे गटाचे त्यांच्याच आमदारांना पैसे वाटले. तरीही त्यांची दोन मते का फुटली. याचं उत्तर आधी संजय राऊतांनी द्यावं”