गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि मनसे यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषत: मुंबईत रंगताना पाहायला मिळत आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला बळ मिळत असतानाच पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधल्यामुळे ही चर्चा अजूनच रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नेमकी भाजपा आणि मनसे युती होणार की नाही? याविषयी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी खुलासा केला आहे.
नितीन गडकरी-राज ठाकरे भेटीनंतर चर्चेला उधाण!
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले होते. यासंदर्भात कोल्हापुरात बोलताना आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मनसेसोबत युती केली जाणार नाही. पण मुंबई महापालिकेत स्वबळावर भाजपची सत्ता आणू”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
“संजय राऊतांना याची लाज वाटली पाहिजे”
दरम्यान, आज संजय राऊतांच्या मालमत्तेवर ईडीनं जप्तीची कारवाई केल्यानंतर त्यांनी केलेल्या टीकेवर आशिष शेलार यांनी टीका केली आहे. “अनिल देशमुख प्रकरणी उच्च न्यालयात सीबीआयने स्थानिक पोलीस धमकी देत असल्याचे शपथपत्रावर सांगितले होते. याची लाज संजय राऊत यांना वाटली पाहिजे”, असं शेलार म्हणाले आहेत.
दगडफेकीवरून चिखलफेकीवर…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. “मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने खेळखंडोबा चालवला असून त्याचा बदला कोल्हापूरची जनता घेईल. छत्रपती संभाजीराजे यांचे अश्रू या निवडणुकीत निखाऱ्याचं रूप घेतील. दगडफेकीवरून आता चिकलफेकीवर महाविकास आघाडी जात आहे, अशी टीका त्यांनी केली.