Ashish Shelar Vote Jihad: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे हे मुद्दे भाजपा आणि महायुतीकडून मांडले गेले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रचाराचा विरोध केला आहे. तसेच मराठी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचा हा दुष्प्रचार असल्याचे म्हटले आहे. ज्याचे विचार पटतील त्या पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करण्याचा अधिकार राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेला आहे, अशी भूमिका संघातर्फे मांडण्यात आली. त्यानंतर आता भाजपाचे नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांच्या युट्यूब चॅनेलवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते हरियाणात जे झाले, ते आपल्याला महाराष्ट्रात होऊ द्यायचे नाही, असे सांगत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशिष शेलार यांनी सज्जाद नोमानी यांच्या व्हिडीला एक्स अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यात त्यांनी नोमानी यांनी केलेले विधान लिहिले आहे. “एक ऐसा व्होट जिहाद करो…”, असे नोमानी म्हणाले. तसेच “जिसके सिपेसालार है : शरद पवार, अझीम सिपाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली”, असेही नोमानी म्हणाले आहेत.

हे वाचा >> ‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप

आपल्या निशाण्यावर महाराष्ट्रासह दिल्ली – सज्जाद नोमानी

सज्जाद नोमानी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १६ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी यांनी मुस्लीम समाजाला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, “मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा (भाजपा) विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपाचा) पराभव झाला, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे.”

“आम्हाला देशात लोकशाही बळकट करायची आहे. संविधानाची अंमलबजावणी देशात झाली पाहीजे. वक्फ सारख्या कायद्यात जे बदल करण्याचा प्रयत्न होत आहेत. ते व्हायला नको. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण याला व्होट जिहादचे नाव देणे चुकीचे आहे. मी काल मुलाखतीत सांगितले होते की, हा एक असा व्होट जिहाद आहे, ज्याचे पाठिराखे शरद पवार आणि इतर नेते आहेत. त्यामुळे माध्यमांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नये”, असे आवाहन नोमानी यांनी केला.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

दरम्यान व्होट जिहाद या शब्दावर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष औवेसी यांनीही आक्षेप घेतला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेद्वारे कोणताही भेदभाव न करता प्रत्येक प्रौढ भारतीयाला मतदानाचा अधिकार दिला आहे. परंतु आमच्या या मताधिकाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचा भाजप ‘व्होट जिहाद’ म्हणत ‘धर्मयुद्ध’ चा नारा देतात. यातून दोन धर्मात तेढ निर्माण करून देश तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप एमआयएमचे नेते, खासदार बॅ. असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar criticized maha vikas aghadhi over vote jihad share all india personal law board sajjad nomani video kvg