श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्याचप्रमाणे आंतरधर्मीय विवाहामध्ये तरुणींचा होणारा शारीरिक आणि मानसिक छळ रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून सत्ताधारी आमदार, मंत्र्यांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे नामोल्लेख न करता निशाणा साधला आहे.
मुंबईत आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या मेहक प्रभूला २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी क्लीनचिट दिली होती. तर, उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, असे सांगून या हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता, असा आरोपा भाजपाने केलेला आहे.
“आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात. उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात? त्यांना श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये.? काळजात ज्यांच्या “मराठीपणाची” काळजीच उरली नाही. मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावे की नाही?” असं शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.
या अगोदर काय म्हणाले होते शेलार? –
‘श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे. तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.’ असं शेलार यांनी म्हटलं होतं.