मागील काही महिन्यांमध्ये वेदान्त फॉक्सकॉन, सॅफ्रन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात गेले आहेत. याच कारणामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिंद गट-भाजपाकूडन महाविकास आघाडीचे सरकार असतानाच हे प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आहेत, असा दावा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली. आदित्य ठाकरेंची भूमिका पाहून पेंग्विनने डोक्यावर हात मारला असता, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप, फडणवीसांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, “बाहेर चहा-बिस्कीट…”

“उद्धव ठाकरे यांनी चालवलेले सरकार आणि आदित्य ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिका याचं वर्णन अहंकारी राजा आणि विलासी राजपूत्र असंच करता येईल. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पत्रकार परिषद आणि प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करत आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी विधानसभेत एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही किंवा त्यांनी विधानसभेच्या बाहेर कधी पत्रकार परिषद घेतली नाही. आपले पिताश्री मुख्यमंत्री असताना एक न्याय आणि दुसरं कोणी मुख्यमंत्री असेल, तर दुसरा न्याय. आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेवर पेंग्विननेही डोक्यावर हात मारला असता,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

हेही वाचा >>> राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘मोदींनी लक्ष द्यावं,’ आता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्या मताशी…”

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर आव्हान दिलं आहे. उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर चर्चेला यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. “खोटं बोलण्याचं नाट्य सुरु असून हे आता संपलं पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी देशात अनेक राज्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे असं म्हटलं आहे. पण स्पर्धेबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्र कुठे कमी पडतोय का? याबाबत चर्चा करण्यासाठी मी त्यांना आव्हान देतो. हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर चर्चेला यावं,” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar criticizes aditya thackeray over commented on eknath shinde and devendra fadnavis prd