राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे २०१९ साली विधानसभेच्या प्रचारातील पावसातील भाषण तुफान गाजले. त्यांच्या भाषणाची आजही राजकीय वर्तुळात चर्चा असते. काल (२६ नोव्हेंबर) असाच अवकाळी पाऊस झाला, नेमकं तेव्हाच शरद पवारांचं नवी मुंबईत भाषण सुरू होतं. नवी मुंबईत भर पावसात झालेल्या भाषणाचीही आज सर्वत्र चर्चा सुरू आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मला असं वाटतं स्वतःचा पक्ष वाचवण्याची ही त्यांची धडपड आहे. कोणी कुठे सभा घ्यावी हा लोकशाहीत ज्याचा त्याचा अधिकार आहे”, असं आशिष शेलार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पावसात सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले होते. आता सभा घेतल्यानंतर उरलेल्या दीड वर्षांत राष्ट्रवादी लोणच्याएवढी तरी राहील का. हा प्रश्न त्यांनी त्यांच्या मनाला विचारावा”, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

काल नेमकं काय घडलं?

नेरुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शरद पवार उपस्थित होते. पाऊस आणि जोराचा वारा वाहत असल्याने येथेही साताऱ्याची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा सभास्थळी ऐकायला मिळाली. शरद पवारांचं भाषण ऐकण्यासाठी त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांनी या लोकांना नाराज केलं नाही. पवारांनी भर पावसात भाषण केलं. साताऱ्यातल्या सभेत दिसलेला शरद पवारांचा तोच जोश, तोच उत्साह आणि तीच आक्रमकता पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

हेही वाचा >> पुन्हा तोच जोश; साताऱ्यानंतर नवी मुंबईत शरद पवारांची भर पावसात सभा, म्हणाले, “निराशेवर मात करून…”

सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर काय?

शरद पवार हे मार्केटमधलं क्रमांक एकचं नाणं आहेत. जेव्हा हेडलाईन करायची असते तेव्हा शरद पवारांचंच नाव घेतलं जातं हे शरद पवार यांचं भाग्य आहे आणि सगळ्यांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. सहा दशकं हे नाणं टिकून आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish shelar criticizes sharad pawar ncp was split in two due to meeting in rain now sgk