महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. राज्यातील अनेक पक्ष महायुती किंवा मविआत सामील झाले आहेत. परंतु, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र अद्याप ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे. परंतु, मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाला आव्हान देण्यासाठी भाजपा मनसेला आपल्याबरोबर घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. अशातच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज (१९ फेब्रुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमुळे मनसे आणि भाजपा युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री आम्ही भाजपाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठीदेखील वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेचे काही वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले. तेव्हापासून मनसे महायुतीत सामील होईल, असं बोललं जाऊ लगलं आहे. या सर्व चर्चांवर आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे.
माजी आमदार आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी शेलार यांना राज ठाकरेंबरोबरच्या भेटीबाबत प्रश्न विचारले. त्यावर आशिष शेलार म्हणाले, राजकारणात नेत्यांच्या भेटी होत असतात. मी आणि राज ठाकरे व्यक्तीगत आयुष्यात मित्र आहोत. तसेच राजकीय जीवनातही आमची मैत्री असल्यामुळे आम्ही भेटत असतो. त्यामुळे अशा भेटींनंतर आम्ही साद घालायला गेलो होतो वगैरे बोलण्यात काही अर्थ नाही. अशा आशयाच्या बातम्या दाखवण्यातही काही अर्थ नाही. या भेटीत मन की बात झाली, जन की बात झाली, महाराष्ट्र की बात झाली. अब बात चलेगी तो बहुत दूर तक चलेगी.
भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मनसेबरोबरच्या युतीची चर्चा केली आणि आशिष शेलार वरिष्ठ नेतृत्वाचा हा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटले, अशा बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या होत्या. यावरही शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. शेलार म्हणाले, मला वाटतं राजकारणात अशा भेटीगाठी होत असतात. नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होत असतात. अशा चर्चा झाल्या पाहिजेत. आमची व्यक्तीगत स्तरावरही चर्चा होत असते. या भेटीत काय झालं त्याचा खुलासा योग्य वेळी केला जाईल. मनसेचं शिष्टमंडळ अलीकडेच आलं होतं, काही गोष्टी आमच्याकडूनही होत्या. त्यामुळे आमच्या या भेटी झाल्या.
हे ही वाचा >> महायुतीत मोठं मंत्रिपद, जयंत पाटील शरद पवार गट सोडणार? म्हणाले, “ते एकमेव…”
मनसे-भाजपा युतीबाबत फडणवीसांची भूमिका काय?
काही दिवसांपूर्वी एका मुलाखीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मनसेबरोबरच्या युतीवर भाष्य केलं होतं. आमची मैत्री आहे परंतु, अद्याप युतीवर चर्चा झालेली नाही, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच आगामी काळात, निवडणुकीच्या वेळी राजकीय चित्र स्पष्ट होईल, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यावर आशिष शेलार म्हणाले, राजकारणात ज्याला कळतं तो समजून घेतो. आमचा राजकीय निर्णय निवडणुका घोषित झाल्यावर सर्वांना कळेल. लोकसभेआधी चित्र स्पष्ट होईल असं फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं आहे, तर तसं होईलच.