गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे मुंबईत आणि विशेषत: वरळी मतदारसंघात फिरत असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरळी हा आदित्य ठाकरेंचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे आशिष शेलार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आपला जम बसवत असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द आशिष शेलार यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माध्यमांशी बोलताना आपलं मत मांडलं आहे.
“मुळातच गड कुणाचा आणि कुणी ठरवला? आणि गडावर ठरणं आणि ठरवणं हे शेलारमामांशिवाय कोण करू शकतं? त्यामुळे गड वगैरे आम्ही मानत नाही. स्वत: आदित्य ठाकरे हेदेखील भाजपाच्या मतांवर निवडून आले आहेत. युतीमध्ये ते जिंकून आले आहेत. त्यामुळे भाजपा मुंबईभर ३२७ दहीहंडीचे कार्यक्रम करते. यात २१७ मंडळांना पक्षाच्या वतीने आम्ही विमा कवच दिलं आहे”, असं ते म्हणाले.
“जांभोरी मैदान तो झांकी है, अभी बहोत कुछ बाकी है. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या कामाला आम्ही आधीच लागलो आहोत. टप्प्याटप्प्याने आम्ही काम करत आहोत. पुढे असे अजून बरेच टप्पे यायचे आहेत”, असं ते म्हणाले.