वरळी अपघातातील पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आरोपी मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? असा प्रश्न विचारत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, एकीकडे कुणाच्या तरी पार्टीत नाचायला जायचं आणि दुसरीकडे वरळीत पीडित कुटुंबाच्या दु:खाला फुंकर मारण्याचं नाटक करायचं, हे आदित्य ठाकरेंनी करू नये, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.
हेही वाचा – अपघातानंतर मिहीर शाहकडून ओळख लपवण्याचा प्रयत्न? पोलिसांना चकवा देण्याकरता शक्कल!
काय म्हणाले आशिष शेलार?
“सरकारने या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालू नये. जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आवश्यक वाटल्यास कडक कलमं लावली पाहिजे. तसेच जी कलमं लावली, त्यावर पीडित कुटुंबाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्यास त्या दु:खी कुटुंबाचे ऐकलं गेलं पाहिजे, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.
“या अपघातात ज्या नाखवा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यांना हवी ती मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, त्यामुळे पब किंवा बारवर कारवाई करा किंवा शाह कुटुंबाचे अनाधिकृत घर असेल त्यावर कारवाई करा, पण आदित्य ठाकरेंना माझी एक विनंती आहे, की नाखवा कुटुंबातील सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर किमान कोणाच्या लग्नाच्या पार्टीत नाचूतरी नका. एकीकडे कुणाच्या तरी पार्टीत नाचायला जायचं आणि दुसरीकडे वरळीत पीडित कुटुंबाच्या दु:खाला फुंकर मारण्याचं नाटक करायचं, हे आदित्य ठाकरेंनी करू नये”, असं प्रत्युत्तरही आशिष शेलार यांनी दिलं.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरे आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख या दोघांनी आज नाखवा कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं होतं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना “तुम्ही कुठेही बुलडोझर चालवा. मात्र मिहीर शाह याच्या घरावर बुलडोझर कधी चालणार? हे पाहणं गरजेचं आहे. नरकातून राक्षस आला तरीही अशी कृती करणार नाही, तितकी वाईट ही केस आहे. अनेक लोक सांगतील की नुकसान भरपाई वगैरे देतो. पण त्यांना एक रुपया नकोय. त्यांना मिहीर शाह याला शिक्षा झालेली बघायची आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
पुढे बोलातना, धडक दिल्यानंतर मिहीर शाह जर थांबला असता तरीही कावेरी नाखवांचा जीव वाचला असता. नाखवा कुटुंब प्रचंड दुःखात आहे. इतकी भयंकर गोष्ट मुंबई, महाराष्ट्रात ही गोष्ट घडू शकते हे पाहूनच दुर्दैवी वाटतं. गुन्हेगार असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन तुम्ही त्याला तुरुंगात टाकू शकता पण असा राक्षस असेल तर काय करणार? मिहीर राजेश शाह राक्षसच आहे. इतकं भयानक हे कृत्य आहे. ६० तासांनंतर जी अटक झाली आहे. त्याला साठ तास का लपायला दिलं? गृहखातं का शांत आहे, गृहमंत्री का शांत आहेत? ” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला होता.