शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परदेशातील फोटो ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट केल्यानं खळबळ उडाली आहे. मकाऊच्या कॅसिनोतील हा फोटो असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे. तसेच, माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. फोटो समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल, असा इशारा संजय राऊतांनी दिला होता. याला भाजपा आमदार आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार म्हणाले, “एलॉन मस्क यांना विनंती करणार की, महाराष्ट्रात त्यातील त्यात प्रभादेवीत बसणाऱ्यांनी पहिल्यांदा गांजाचे सेवन केलं नाही, याचं प्रमाणपत्र ट्वीट करावे, मगच, भाष्य करावे. दिवसाढवळ्या गांजा ओढणारे दुसऱ्यांवर आरोप करत आहेत.”
“संजय राऊतांनी गोरेगावमधील मराठी माणसांची घरे खाल्ली”
“कोण संजय राऊत? कधी जनतेतून उभे राहिलेत का? याच संजय राऊतांनी गोरेगावमधील मराठी माणसांची घरे खाल्ली आहेत. संजय राऊतांकडे २७ फोटो असतील, तर आमच्याकडे २७० आहेत. मग, पेग-पेंग्विन पार्टीचे चालक आणि मालक समोर आणावे लागतील,” असा इशारा आशिष शेलारांनी दिला आहे.
हेही वाचा : “महाराष्ट्र पेटलाय अन् हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत…”, बावनकुळेंचा ‘तो’ फोटो ट्वीट करत राऊतांचा हल्लाबोल
नेमकं प्रकरण काय?
संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊच्या कॅसिनोतील फोटो ‘एक्स’ अकाउंटवर ट्वीट केला. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत,’ असं म्हणत संजय राऊतांनी बावनकुळेंना लक्ष्य केलं होतं. यानंतर संजय राऊत आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
“मी भाजपाचं दुकान बंद करणार नाही, कारण..”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. मात्र, आमच्यात माणुसकी आहे. २७ फोटो आणि व्हिडीओ समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल. पण, मी ते करणार नाही. कारण, हे दुकान २०२४ पर्यंत चाललं पाहिजे.”
हेही वाचा : संजय राऊतांकडून कॅसिनोतील ‘तो’ फोटो ट्वीट, बावनकुळे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी मकाऊ येथे…”
“आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय”
“मी कधी कुणावरही व्यक्तीगत टिप्पणी करत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल. आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.