राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला असून पहिल्या टप्यात शिंदे गटाचे ९ आणि भाजपाचे ९ अशा एकूण १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये कोणत्याही अपक्ष नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणाऱ्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो, त्यालाच मंत्रीपद मिळते असे उपहासात्मक भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे. बच्चू कडू यांच्या याच भाष्यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांना प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. बच्चू कडू यांनी हा अधिकार त्यांच्यापुरता मर्यादित ठेवावा, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला आहे.

हेही वाचा>>> “…तर ते वेगळं चिन्ह ठरवू शकतात” धनुष्यबाणाच्या वादावरून शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

“बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांचे सहकारी आहेत. बच्चू कडू यांचे काही मत असेल तर शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात चर्चा होईल. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. तो त्यांच्यापर्यंत मर्यादित ठेवावा,” असे आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा>>> “ज्यांच्या पक्षाचा जन्मच..,” भाजपा इतर पक्षांना संपवतो या शरद पवारांच्या आरोपावर आशिष शेलारांचा पलटवार

“धोका देणाऱ्यांनी या महाराष्ट्राची बदनामी देशभरात केली. काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वापासून कोणाच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला, धोका कोणी केला, अंतर्गत काँग्रेसमध्ये कोणी धोका दिला, याची माहिती बच्चू कडू यांनी घ्यावी,” असे म्हणत आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.

हेही वाचा>>> बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार! नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

भाजपाकडून अन्य पक्षांना संपवण्याचे काम केले जाते, असा आरोप भाजपावर केला जातोय. यावरदेखील आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली. “एखादा माणूस, एखादी संघटना बलवान होत असते तेव्हा बाकीच्यांना कमी संधी उपलब्ध होत असते. भाजापाने कोणताही पक्ष संपवणे, फोडणे तसेच उखाड दिया म्हणणे हे धंदे केलेले नाहीत. उखाड दिया म्हणणारे आज तुरुंगात आहेत. संपवण्याची भूमिका बोलणाऱ्यांची वाताहत झाली आहे. मोदी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणारे वेगवेगळ्या तपसा संस्था तसेच न्यायालयासमोर आहेत. भाजपाने हे सगळे आरोप सहन केले. मात्र कोणालाही संपवण्याची भूमिका भाजपाने मांडली नाही. भारत म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजे भारत अशी भूमिका घेणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये,” असा टोलाही अशिष शेलार यांनी शरद पवार, संजय राऊत आणि काँग्रेसला त्यांचे नाव न घेता लगावला.

Story img Loader