सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समोर आल्यापासून राज्यातील राजकारणात नैतिकतेवर सर्वाधिक बोललं जात आहे. मी नैतिकता म्हणून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, नैतिकतेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आगपाखड केली. आता भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही नैतिकतेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घेरलं आहे.
“नैतिकता, हिंमत आणि मर्द या तीन शब्दांशी तुमचं प्रेम आहे ना उद्धवजी. मग नैतिकता, हिंमत आणि मर्द यासाठी तुम्हाला आमचा थेट प्रश्न आहे. आमच्या मतांवर तुमचे सुपूत्र निवडून आले आहेत. नैतिकतेने भाजपाच्या मतांमुळे त्यांचा विजय झाला आहे. स्वतःच्या मुलाला राजीनामा द्यायला लावा. मर्द असाल, हिंमत असेल, नैतिकता असेल तर तुमच्या आमदारांना सुपूत्रासहित राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा मग दुसऱ्यांना सल्ले द्या”, असं आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचा >> “बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका, नाहीतर…”, संजय राऊतांचे आता थेट पोलिसांनाच आवाहन
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्नही विचारले आहेत. “प्रश्न साधा आणि सरळ आहे. तुम्ही कोर्टात कशाला गेला होतात हे सरकार अवैध घोषित करायला गेला होता, करू शकलात का? १६ आमदारांना अपात्र करू शकलात का? विधानसभा अध्यक्षांचा निर्णय फिरवू शकलात का? राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका चुकीच्या आहेत, बदलल्या पाहिजेत असं म्हणालात पण हे बदलू शकलात का? पुन्हा तुमचं सरकार स्थापन व्हावं म्हणून कोर्टात गेलात, पण सत्ता स्थापन करू शकलात का? शिंदेंना अवैध ठरवायचं होतं म्हणून कोर्टात गेलात, पण तुम्ही अवैध ठरवलात का? नाही. कोर्टाकडून मिळालेलं उत्तर नकारात्मक असल्याने तुमचा सत्तासरपटूपणा इतक्या वर गेला की गिरा तो भी टांग उपर ही भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंचं धोरण यापेक्षा वेगळं काही नाही”, असंही आशिष शेलार म्हणाले.
हा मैत्रीचा सल्ला – शेलार
“मंत्रिमंडळाचे मंत्री वाचवू शकला नाहीत, स्वतःच्या परिवारातील भावाचं प्रेम वाचवू शकला नाहीत, चुलत भावाचा विश्वास संपादू शकला नाहीत, वहिनीचं प्रेम घेऊ शकला नाहीत, स्वतःच्या पक्षातील सोडून गेलेल्या नगरसेवकांना जवळ घेऊ शकला नाहीत, मग तुम्ही देश वाचवायची कसल्या गोष्टी करताय, त्यामुळे उजळणी करायची असेल तर घरापासून पक्षापर्यंत करा, हा आमचा मैत्रीचा सल्ला आहे”, असा टोलाही यावेळी आशिष शेलारांनी लगावला.