अजित पवारांनी घडवून आणलेल्या राजकीय नाट्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे. विरोधात असलेले अजित पवार आज सत्ताधारी बनल्याने महाविकास आघाडीकडून अजित पवारांवर टीका केली जातेय. अजित पवार काल राजभवनात दाखल झाल्यापासून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली होती. एवढंच नव्हे तर संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वैरही अनेकदा समोर आले होते. दरम्यान, संजय राऊत सातत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असतात. यामुळे त्यांचेच नेते अडचणीत येतात असा आरोप केला जातो. यावरून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.
हेही वाचा >> अजित पवारांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं काय होणार? अशोक चव्हाणांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…
अहंकारी राजा आणि पुत्र विलासी
दिमतीला ठेवला शापित दरबारी
अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी
अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी
संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी
काय ती रोज सुरू असायची सरबराई!
बघा काय अवकळा आली
गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला
अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला
झाला मोह “जाणत्या राजांना” याच संजयाचा
अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा
आम्ही सांगतं होतो वारंवार यांना
आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना
आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा
यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!
संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. यावरून अनेक नेते संजय राऊतांना हेरतात. तसंच, संजय राऊत यांच्या बडबड्या वृत्तीमुळेच शिवसेनेत फुट पडली असा दावाही अनेकांनी केला आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही संजय राऊत सतत हस्तक्षेप करत असल्याने हे सरकार कोसळले असाही आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. त्यातच, संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हस्तक्षेप वाढल्याने राष्ट्रवादी फुटली अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात केली जातेय. भाजपानेही असाच दावा केला आहे. यावरून आशिष शेलारांनी आता कवितेच्या माध्यमातूनच त्यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.