विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नोटीस पाठवली असून, उद्या बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज पत्रकारपरिषद घेत ही माहिती दिली. तसेच, निश्चितपणे मी उद्या ११ वाजता बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे. या पत्रकारपरिषदेस भाजपा नेते आशिष शेलार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती. मुंबई पोलिसांकडून फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
“घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धीने असे तुणतुणे वाजवता. मग..घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी?लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात!” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
तर, “मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे, बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या ११ वाजता बोलावलं आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. आता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषता परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसांमधील काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सूचत नसल्याने, अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे. मी निश्चितपणे उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील.” अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना दिली आहे.